इंग्लंविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेमधील दोन सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व आणि ऑस्ट्रेलियन संघाला झिम्बाब्वेने दिलेला धक्का यामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.
विशेष म्हणजे, हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या रंगतदार एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेने ३ विकेट्सने विजय मिळवत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विजयाचा ३१ वर्षांचा दुष्काळाला पूर्ण विराम दिला. पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाची आयसीसीच्या क्रमवारीत तिसऱया स्थानी घसरण झाली आहे. तर दक्षिण आफ्रिका ११३ गुणांसह दुसऱया स्थानी आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱया एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवत टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत ११४ गुणांसह ऑस्ट्रेलिया संघाची बरोबरी साधली. त्यानंतर झिम्बाब्वे संघाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या गुणांमध्ये तीन गुणांची कपात होऊन संघाला तिसऱया स्थानी समाधान मानावे लागले आहे.
श्रीलंका संघाकडेही १११ गुण असून ऑस्ट्रेलियाच्या मागोमाग चौथे स्थान संघाला मिळाले आहे. क्रमवारीतील पहिल्या चार संघांमध्ये अवघ्या एक-दोन गुणांचा फरक असल्यामुळे आता इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

Story img Loader