वृत्तसंस्था, कानपूर
अंधुक प्रकाश आणि त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे भारत व बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ शक्य झाला. यात वेगवान गोलंदाज आकाश दीप (२/३४) आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (१/२२) यांनी प्रभावी मारा करताना भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबविण्याचा निर्णय झाला, तेव्हा बांगलादेशची ३ बाद १०७ अशी स्थिती होती.
कानपूर येथे आदल्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रीन पार्क स्टेडियमच्या मैदानाचा काही भाग ओला राहिला होता. त्यामुळे शुक्रवारी नाणेफेकही तासभर उशिराने झाली. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि ढगाळ वातावरण लक्षात घेता कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने संघात एकही बदल न करता तीन वेगवान गोलंदाजांसहच खेळण्याचा निर्णय घेतला.
जसप्रीत बुमराने सुरुवातीच्या षटकांत चेंडू दोन्ही बाजूंना स्विंग केला. त्याने तीन निर्धाव षटकेही टाकली, पण तो बळी मिळवू शकला नाही. दुसऱ्या बाजूने मोहम्मद सिराजही बळी मिळवण्यात अपयशी ठरला. बांगलादेशकडून शदमन इस्मालने (३६ चेंडूंत २४) सकारात्मक पद्धतीने फलंदाजी केली, तर अन्य सलामीवीर झाकिर हसनचा (२४ चेंडूंत ०) केवळ खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न होता. बुमरा, सिराजला बळी मिळवता न आल्याने रोहितने चेंडू नवोदित आकाश दीपकडे सोपवला.
आकाशने आपल्या पहिल्याच षटकातील तिसऱ्याच चेंडूवर झाकिर हसनचा अडसर दूर केला. चेंडू झाकिरच्या बॅटची कड घेऊन गलीच्या दिशेने गेला आणि यशस्वी जैस्वालने आपल्या उजव्या बाजूला वाकून त्याचा सुंदर झेल घेतला. मग आकाश दीपने आपल्या तिसऱ्या षटकात शदमनलाही बाद केले. चेंडू शदमनच्या पॅडला लागल्यावर भारताने अपील केले, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. कर्णधार रोहितने ‘रीव्ह्यू’चा वापर केला आणि यात चेंडू यष्टीला लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भारताला दुसरे यश मिळाले.
यानंतर कर्णधार नजमुल हुसेन शांतो (५७ चेंडूंत ३१) आणि मोमिनुल हक (८१ चेंडूंत नाबाद ४०) यांनी चिवट फलंदाजी करत बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी रचली. ही जोडी बांगलादेशला भक्कम स्थितीत नेण्याच्या प्रयत्नात असतानाच अश्विनने शांतोला पायचीत केले. यानंतर खेळपट्टीवर आलेल्या मुशफिकूर रहीम (१३ चेंडूंत नाबाद ६) आणि मोमिनुल यांनी संयमाने फलंदाजी केली.
अंदाज खरा…
कानपूर येथे होत असलेल्या या कसोटीच्या पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पहिल्या दिवशी नाणेफेकीला विलंब झाला. मग उपाहाराच्या आधीचे अखेरचे षटक सुरू असताना संततधार सुरू झाली आणि ती कायम राहिल्याने दुसरे सत्र १५ मिनिटे उशिराने सुरू झाले. या सत्रात केवळ ९ षटके झाल्यानंतर ढग दाटून आले आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने मैदान आच्छादित करण्यात आले आणि पुन्हा खेळ होऊ शकला नाही.
४२० रविचंद्रन अश्विनने आपली दर्जेदार कामगिरी सुरू ठेवताना भारताकडून आशियात खेळलेल्या कसोटीत सर्वाधिक बळी मिळवण्याचा विक्रम आपल्या नावे केला. आशियात खेळलेल्या कसोटीत अश्विनचे आता ४२० बळी झाले असून त्याने अनिल कुंबळेला (४१९ बळी) मागे टाकले. आशियातील कसोटीत सर्वाधिक बळींचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या (६१२) नावावर आहे.