चट्टोग्राम : केएल राहुलची नेतृत्वक्षमता आणि फलंदाजांची बुधवारपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत कस लागणार आहे. तसेच, या मालिकेचा निकाल जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पात्रता मिळवण्याच्या भारताच्या आशा आणखी मजबूत करू शकतात.
भारतीय संघ या मालिकेत काही महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरेल. भारत ‘डब्ल्यूटीसी’ गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेनंतर चौथ्या स्थानावर आहे. भारताला जूनमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याकरता पात्रता मिळवायची असल्यास त्यांना बांगलादेशविरुद्ध दोन आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चारही कसोटी सामने जिंकावे लागतील. भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात जहूर अहमद स्टेडियम येथून करेल. या मैदानातील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल राहते, तर सामन्याच्या अखेरच्या दिवसांत या खेळपट्टीमधून फिरकी गोलंदाजांना मदतही मिळते.
बांगलादेशने गेल्या २२ वर्षांत भारताला या प्रारूपात नमवलेले नाही. जलदगती गोलंदाज तास्किन अहमद, इबादत हुसैन, शरीफुल इस्लाम यांच्याशिवाय फिरकी गोलंदाज शाकिब उल हसन आणि ताइजुल इस्लाम यांच्यावर संघाला विजय मिळवून देण्याची मदार असेल.
राहुलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा
गेल्या वर्षभरात राहुलला आपल्या नेतृत्वगुणांनी प्रभावित करता आलेला नाही आणि या मालिकेतील कामगिरीच्या बळावर राहुल भविष्यात संघाचे नेतृत्व करेल का हे ठरेल. गेल्या काही काळात राहुलच्या मर्यादित षटकांच्या कामगिरीतही घसरण झाली आहे आणि त्यामुळे फलंदाजीत त्याला चमकदार कामगिरीची आवश्यकता आहे. शुभमन गिल आणि राहुल डावाची सुरुवात करतील, तर मध्यक्रमात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर खेळताना दिसेल.भारतीय संघ कसोटीत प्रबळ दावेदार म्हणून सुरुवात करेल.
तीन जलदगती गोलंदाज की फिरकी गोलंदाज?
भारतीय संघ तीन जलदगती गोलंदाजांसह उतरणार की तीन फिरकी गोलंदाजांसह याचा निर्णय कर्णधार राहुल आणि प्रशिक्षक द्रविडला घ्यावा लागेल. भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरला तर कुलदीप यादवला संधी मिळेल किंवा फिरकी गोलंदाज सौरभ कुमार पदार्पण करेल याकडे सर्वाचे लक्ष असेल. जलदगती गोलंदाजीची मदार ही उमेश यादव व मोहम्मद सिराजवर असेल. तीन जलदगती गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय झाल्यास जयदेव उनाडकट किंवा नवदीप सैनीपैकी एकाला संधी मिळू शकते.
- वेळ : सकाळी ९ वा.
- थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन ३, टेन ५