पीटीआय, कॅनबेरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिलचे मैदानावर पुनरागमन झाले असून त्याने शुक्रवारी सराव सत्रात सहभाग नोंदवला. त्याने नेट्समध्ये फलंदाजीही केली. अंगठ्याच्या दुखापतीमुळे गिलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात खेळता आले नव्हते. मात्र, अॅडलेड येथे ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता बळावली आहे.

पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत गिलची अनुपस्थिती भारताला फारशी जाणवली नाही. भारताने हा सामना २९५ धावांनी जिंकत बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली. मात्र, गिलने गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावित केले होते. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे अंतिम ११ खेळाडूंत पुनरागमन अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>Indian Team New ODI Jersey: ‘मेन इन ब्ल्यू’चा नवा अवतार, टीम इंडिया आता नव्या जर्सीमध्ये दिसणार; लाँचिंगचा व्हिडीओ पाहिलात का?

भारतीय संघ शनिवारपासून ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश संघाविरुद्ध दोनदिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्याआधी भारताच्या काही खेळाडूंनी शुक्रवारी मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे नेट्समध्ये सराव केला. यावेळी गिलने यश दयाल आणि आकाश दीप यांसारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना केला.

‘‘फलंदाजी करताना काही त्रास जाणवतो का किंवा वेदना होतात का, हे मला पाहायचे होते. मात्र, तसे काही झाले नाही. मला आणि फिजिओ कमलेश जैन यांना अपेक्षा होती, त्याहून माझी दुखापत लवकर बरी झाली आहे. मी खूप आनंदी आहे,’’ असे ‘बीसीसीआय’ने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमध्ये गिल म्हणाला.

हेही वाचा >>>VIDEO: बापरे! फाफ डू प्लेसिस बॉल बॉयवरून गोलांटी उडी खात पडला मैदानाबाहेर, लाईव्ह सामन्यात घडली मोठी घटना

पहिल्या कसोटीपूर्वी सराव सामन्यादरम्यान गिलच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याला पहिल्या कसोटीला मुकावे लागले. मात्र, भारतीय संघाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे आपले मनोबल वाढल्याचे गिल म्हणाला.

दोनदिवसीय सराव सामना आजपासून

पुढील आठवड्यात अॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाइट) होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला आज, शनिवारपासून ऑस्ट्रेलियन पंतप्रधान एकादश संघाविरुद्ध दोनदिवसीय सराव सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. कॅनबेरा येथे गुलाबी चेंडूने होणाऱ्या या सराव सामन्यात भारतीय संघ आपला फलंदाजी क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. भारताने आतापर्यंत केवळ चार ‘डे-नाइट’ कसोटी सामने खेळले आहेत. चार वर्षांपूर्वी अॅडलेड येथे झालेल्या ‘डे-नाइट’ कसोटीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६ धावांत गारद झाला होता. त्यामुळे भारतीय संघाचा यावेळी अधिक तयारीनिशी मैदानात उतरण्याचा प्रयत्न असेल.

● वेळ : सकाळी ९.०५ वा. ● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India batsman shubman gill returns to the field after injury sport new amy