वृत्तसंस्था, विशाखापट्टणम : सलामीवीर ऋतुराज गायकवाड (३५ चेंडूंत ५७ धावा) आणि इशान किशन (३५ चेंडूंत ५४ धावा) यांच्या अर्धशतकांनंतर हर्षल पटेल (२५ धावांत ४ बळी) आणि यजुर्वेद्र चहल (२० धावांत ३ बळी) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर मंगळवारी भारताने तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेतील आव्हान टिकवले. गेल्या दोन सामन्यांत फारशी चमक न दाखवणाऱ्या गोलंदाजांनी या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
विशाखापट्टणम येथे झालेल्या लढतीत भारताने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार टेम्बा बव्हुमा (८) लवकर माघारी परतला. रीझा हेंड्रिक्स (२३) आणि ड्वेन प्रिटोरियस (२०) यांनी संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अधिक काळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. चहल आणि हर्षलच्या भेदक माऱ्यासमोर पाहुण्या आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७१ अशी बिकट झाली. गेल्या सामन्यात आफ्रिकेच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडणाऱ्या हेन्रीच क्लासेनने (२९) काही चांगले फटके मारले, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. त्यामुळे १९.१ षटकांत १३१ धावसंख्येवर आफ्रिकेचा डाव आटोपला.
त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गेल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या सलामीवीर ऋतुराजने आक्रमक खेळ करत किशनसह पहिल्या गडय़ासाठी ९७ धावांची भागिदारी रचली. हे दोघेही बाद झाल्यानंतर अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने (२१ चेंडूंत नाबाद ३१ धावा) संघाला निर्धारित २० षटकांत ५ बाद १७९ धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेकडून प्रिटोरियसने (२९ धावांत २ बळी) चांगली गोलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ५ बाद १७९ (ऋतुराज गायकवाड ५७, इशान किशन ५४; ड्वेन प्रिटोरियस २/२९) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : १९.१ षटकांत सर्वबाद १३१ (हेन्रीच क्लासेन २९, रीझा हेंड्रिक्स २३; हर्षल पटेल ४/२५), यजुर्वेद्र चहल ३/२०)
सामनावीर : यजुर्वेद्र चहल