भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड लीग उपांत्य फेरीच्या तिसऱ्या सराव सामन्यात अमेरिकेचा ४-० असा धुव्वा उडविला. या विजयाबरोबर २० जून ते ५ जुलै या कालावधीत होणाऱ्या या स्पध्रेसाठी सज्ज असल्याचा दावा भारतीय संघाने केला आहे. मात्र, भारतीय महिला संघाला ़इटलीकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला. भारताची कर्णधार रितू राणी हिने एकमेव गोल केला.
सरदार सिंग याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारतीय संघाने २०व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंग याने केलेल्या गोलच्या बळावर आघाडी घेतली. ४९व्या मिनिटाला ललित उपाध्येय याने ही आघाडी २-० अशी वाढवली.
तीन मिनिटांनंतर रुपिंदरने पुन्हा पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करून अमेरिकेला ०-३ असे पिछाडीवर टाकले. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला जसजित सिंग खुल्लर याचा पेनल्टी कॉर्नरचा प्रयत्न अमेरिकेचा गोलरक्षकाने हाणला. मात्र, त्याला चेंडू स्वत: जवळ ठेवण्यात अपयश आले आणि युवराज वाल्मीकीने भारतासाठी चौथा गोल केला. भारताचा चौथा सराव सामना ब्रिटनशी होणार आहे.