ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला संघाने ४८ धावांनी विजय मिळवला. उपकर्णधार स्मृती मानधनाच्या ८३ आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या तडाखेबाज ४३ धावांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ ९ बाद ११९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने सार्थ ठरवला. तिने ५५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८३ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतने देखील पदाला साजेशी खेळी केली. तिने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार खेचत ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक ३ बळी टिपले.

ऑस्ट्रेलियाला भारताने दिलेले १६८ धावांचे आव्हान पेलता आले नाही. त्यांनी सर्वबाद (९) ११९ धावा केल्या. मुनी, गार्डनर, अनुभवी लँनिंग आणि एलिस पेरी यांच्याशिवाय इतर कोणालाही २ अंकी धावसंख्या करता आली नाही. एलिस पेरीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. भारताकडून दीप्ती शर्मा, पूनम आणि राधा यादव या तिघींनी २-२ बळी बाद केले.

Story img Loader