भारतीय महिला संघाने अतिशय रोमहर्षक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. भारतीय महिलांनी मुंबईतील डॉ. डी. व्हाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या हा सामना चार धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय महिलांनी १-१ ची बरोबरी केली आहे.
सुपर ओव्हरमध्ये विजय
भारतीय महिलांनी सुपर ओव्हरमध्ये २० धावा केल्या. सहा चेंडूंमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करुन २१ धावा करणं ऑस्ट्रेलियन संघाला जमलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघाला १६ धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताने हा सामना जिंकला. वेगवान गोलंदाज रेणूका सिंहने सुपर ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली. २० धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाला गाठता येणार नाही अशी टिचून गोलंदाजी रेणूकाने केली.
नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
स्मृती मंधानाने ४९ चेंडूंमध्ये ७९ धावा करत सामना टाय करण्यामध्ये मोलाचा हातभार लावला. तळाची फलंदाज असलेल्या रिचा घोषनेही सुरखे फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया इतकीच धावसंख्या स्कोअरकार्डवर झळकावली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. बेथ मूनी आणि ताहलीय मॅग्राथने १०० हून अधिक धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियन संघाला १८७ धावांपर्यंत मजल मारण्यासाठी हातभार लावला.
भारताची दमदार सुरुवात
भारतानेही या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. शैफाली वर्मा आणि स्मृती मंधानाने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली. या फलंदाजीच्या जोरावरच भारताला भक्कम पाया रचून १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. सुरुवातीपासूनच वेगाने धावा करताना दोघींनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. स्मृतीने सामन्यातील दुसऱ्याच षटकामध्ये तीन चौकार लगावत खणखणीत सुरुवात केली. एलीस पेरीने गोलंदाजी केलेल्या पाचव्या षटकामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. शैफालीने दोन चौकार लगावले. याच षटकामध्ये शैफालीचा झेल घेण्याची संधी ऑस्ट्रेलियान मेगनने गमावली. भारताने सहाव्या षटकामध्ये आठ धावा करत पॉवरप्ले संपताना बिनबाद ५५ धावांपर्यंत मजल मारली होती.
…अन् डाव गडगडला
भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या नऊ षटकांमध्ये ७६ धावांची भागीदारी केल्याने भारताने या सामन्यामध्ये वर्चस्व मिळवलं. मात्र नवव्या षटकामध्ये शैफाली अॅलना किंगच्या गोलंदाजीवर २३ चेंडूंमध्ये ३४ धावा करुन बाद झाली. पुढल्याच षटकामध्ये जेमिमा रॉड्रिग्ज बाद झाल्याने भारताची स्थिती ८१ वर दोन गडी बाद अशी झाली. भारतीय संघाची कर्णधार हरपमनप्रीतने काही वेळ खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी घेतला आणि नंतर तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. तीने एकाच षटकामध्ये आपल्या स्लॉग स्वीपच्या मदतीने चौकार आणि षटकार लगावला.
स्मृती तंबूत परतली
स्मृतीने अॅलना किंगला एकाच षटकामध्ये षटकार आणि चौकार लगावत ३७ चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक झळकावलं. तिने १६ व्या षटकामध्येही एक उत्तुंग षटकार लगावला. मात्र याच षटकामध्ये हरमनप्रित २२ चेंडूंमध्ये २१ धावा करुन बाद झाली. भारताला २४ चेंडूंमध्ये ४६ धावांची गरज असताना १७ व्या षटकामध्ये स्मृतीने षटकार मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकली. यानंतर मैदानात आलेल्या रिचा घोषने त्याच षटकात षटकार लगावला.
सामना जिंकणार असं वाटत असतानाच…
पुढल्या षटकामध्ये रिचाने दोन षटकार लगावले. रिचाच्या फटकेबाजीमुळे शेवटच्या दोन षटकांमध्ये १८ धावांची गरज भारताला होती. भारत सामना जिंकणार असं वाटत असतानाच १९ व्या षटकामध्ये दिप्ती शर्मा बाद झाली आणि सामना पुन्हा रंजक स्थितीत आला. शेवटच्या षटकामध्ये देविका विद्याने दोन चौकार लगावत सामना बरोबरीत आणला. शेवटच्या षटकामध्ये भारतीय महिलांनी १३ धावा करत सामना बरोबरत सोडवला.
४७ हजारांची उपस्थिती
त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये भारताने २० धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाला १६ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्मृती मंधानाला तिच्या फलंदाजीसाठी प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. या सामन्याला ४७ हजार प्रेक्षक उपस्थित होते असं बीसीसीआयने म्हटलं आहे.