Ind vs Australia Semifinal Match : मंगळवारी ४ मार्च रोजी टीम इंडियानं दुबईत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारून झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता येत्या रविवारी ९ मार्च रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील विजेत्या संघाशी होईल. या विजयातून भारतानं १९ सप्टेंबर २०२३ रोजी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढल्याच्या भावना क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. मैदानावर के. एल. राहुलनं विजयी षटकार खेचण्याच्या काही वेळ आधीचा भारतीय ड्रेसिंग रूममधला एक व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात भारताच्या विजयामध्ये रनमशीन विराट कोहलीनं ९८ चेंडूंत केलेल्या ८४ धावांचं मोलाचं योगदान होतं. मात्र एक उत्तुंग षटकार खेचण्याच्या प्रयत्नात विराट कोहली झेलबाद झाला. पण तोपर्यंत त्यानं भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं होतं. विराट अशा प्रकारे बेजबाबदार फटका मारून बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानावर उतरला. हार्दिक पंड्यानंही चौकार आणि षटकारांच्या मदतीने २८ धावांची एक झटपट पण विजयासाठी महत्त्वाची खेळी केली. पण हार्दिकही बाद झाल्यानंतर मैदानात रविंद्र जाडेजा उतरला. नेमका याच वेळचा भारतीय ड्रेसिंग रूममधला एक व्हिडीओ BCCI नं शेअर केला आहे.

काय आहे Video मध्ये?

हा व्हिडीओ हार्दिक पंड्या बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा मैदानावर उतरतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये रवींद्र जडेजा ड्रेसिंग रूममधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीनं सगळ्यात डावीकडच्या भिंतीजवळ बसलेल्या रोहित शर्माकडे बघून एक मिश्किल टिप्पणी केली. “मारने तो छक्काही जा रहा है वो (तो षटकार मारण्यासाठीच जात आहे)” असं विराट कोहलीनं म्हणताच रोहित शर्मा हसू लागला. त्याबरोबर ड्रेसिंग रूमधील इतर खेळाडूही हसू लागले. याआधी विराट कोहलीही विजयापर्यंत झटपट पोहोचण्यासाठी षटकार खेचण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता. त्यावर रोहित शर्मानं नाराजी व्यक्त केली होती. त्यावरूनच विराटनं ही मिश्किल टिप्पणी केली!

या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतासमोर ५० षटकांत २६५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. दुबईच्या या मैदानावर सर्वाधिक २६६ धावांचं आव्हान सर झाल्याची नोंद आहे. त्यामुळे भारतासाठी हा विजय कठीण असेल असं बोललं जात होतं. त्यात कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल हे दोघे स्वस्तात माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलिया नेहमीप्रमाणे भारतीय फलंदाजांचा पिच्छा पुरवणार असं वाटू लागलं होतं. मात्र, विराट कोहलीनं लौकिकाला साजेसा खेळ करत आधी अक्षर पटेल, मग के एल राहुल यांच्या साधीनं भारताचा विजय सुनिश्चित केला. पण षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाल्यामुळे त्याला माघारी परतावं लागलं. शेवटी के. एल. राहुलनं विजयी षटकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

टीम इंडियाचं सेलिब्रेशन!

BCCI नं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये टीम इंडियानं विजयानंतर केलेल्या सेलिब्रेशनची दृश्य दिसत आहेत. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारतानं आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या निराशाजनक कामगिरीला तिलांजली देत विजय साजरा केला. याआधी २०११ च्या वर्ल्डकप स्पर्धेत नॉकआऊट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर गेल्या १४ वर्षांत चार वेळा अशा नॉकआऊट सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयश आलं होतं. त्यात २०२३ च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील जिव्हारी लागलेल्या पराभवाचाही समावेश आहे. अखेर यंदा भारतानं तो शिक्का पुसून काढत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर निर्भेळ विजय मिळवला आहे.