IND vs BAN Champions Trophy Highlights in Marathi: शुबमन गिलचं शतक, केएल राहुलचा विजयी षटकार आणि मोहम्मद शमीचे ५ विकेट्स… यासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२८ धावा केल्या. तर भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना ६ विकेट्सने आणि २१ चेंडू शिल्लक ठेवत जबरदस्त विजयाची नोंद केली. शुबमन गिल, मोहम्मद शमी हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले.

शुबमन गिल पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे आणि या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावत आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. सलामीसाठी उतरलेला गिल भारताला विजय मिळवून देतच माघारी परतला. गिलने १२९ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या. उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलने भारताच्या डावाची जबाबदारी घेत विजय मिळवून दिला.

तर मोहम्मद शमीने मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. पण आयसीसीने टूर्नामेंटमध्ये पाऊल ठेवताच शमीचा तोच वादळी फॉर्म पुन्हा पाहायला मिळाला. शमीने बांगलादेशच्या डावात ५ विकेट्स घेत आपल्या भेदक गोलंदाजीचा प्रत्यय दाखवून दिला. शमीने १० षटकांत ५३ धावा देत ५ विकेट्स घेतले.

बांगलादेशने दिलेल्या २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानात उतरली. रोहित शर्मा झटपट खेळी करत ७ चौकारांसह ४१ धावा करत बाद झाला. तर विराट कोहली २२ धावा, श्रेयस अय्यर १५ धावा, अक्षर पटेल ८ धावा करत बाद झाले. विराट, श्रेयस आणि अक्षरचे लागोपाठ विकेट गेल्यानंतर भारतीय संघ आता पेचात अडकतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली. पण नंतर आलेल्या केएल राहुलने गिलबरोबर संघाचा डाव सावरत विजयाकडे नेले.

केएल राहुलचा एक सोपा झेल सोडल्यानंतर राहुलने गियर बदलत गिलबरोबर वेगवान खेळी केली. राहुलने ४७ चेंडूत २ षटकार आणि एका चौकारासह ४१ धावा केल्या. तर शुबमन गिल शतकी खेळी करत नाबाद माघारी परतला. बांगलादेशकडून रिशाद हुसैनने २ तर मुस्तफिजूर आणि तस्किन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

तत्त्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयही बांगलादेशसाठी योग्य ठरला नाही. बांगलादेशच्या संघाने ५ विकेट्स गमावत फक्त ३ धावा केल्या होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या षटकात सलग २ विकेट गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसून आले. ९व्या षटकापर्यंत, संघाने केवळ ३५ धावांमध्ये ५ विकेट गमावल्या होत्या, त्यापैकी शमीने २ विकेट घेतल्या होत्या. ९व्या षटकात अक्षर पटेलने लागोपाठ २ विकेट घेतल्या मात्र रोहित शर्माने जकीर अलीचा झेल सोडल्याने अक्षर हॅटट्रिक घेऊ शकला नाही.

IND vs BAN: रोहित शर्माची वनडेमध्ये ऐतिहासिक कामगिरी, सचिन तेंडुलकरला मागे टाकत ठरला जगातील दुसरा फलंदाज

रोहितच्या कॅच ड्रॉपचा फटका टीम इंडियाला बसला. जकीर अलीने तौहीद हृदयसह सहाव्या विकेटसाठी १५४ धावांची शानदार भागीदारी करत संघाटा डाव सावरला. यादरम्यान हार्दिक पंड्यानेही झेल सोडत तौहीदला दिलासा दिला. त्यावेळी तो केवळ २३ धावांवर खेळत होता. पण दोन्ही फलंदाजांनी याचा फायदा घेतला आणि या शानदार भागीदारीसह त्यांनी संघाला स्पर्धात्मक स्थितीत आणले. जकीरला बाद करून शमीने एकदिवसीय क्रिकेटमधील २०० विकेट पूर्ण केले.

तर तौहीदने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण करून तो दिवस संस्मरणीय बनवला. मात्र, शमीने शेवटच्या फलंदाजांना जास्त काळ टिकू दिले नाही आणि ५ विकेट घेत बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला. भारताकडून शमीने ५, हर्षित राणाने ३, अक्षर पटेलने २ विकेट घेतले. भारताचा आता पुढील सामना रविवारी २३ फेब्रुवारीला पकिस्तानविरूद्ध होईल.

Story img Loader