भारताने २१ वर्षांखालील सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत शानदार सुरुवात केली. सलामीच्या सामन्यात भारताने सुरेख कामगिरी करत इंग्लंडचा २-१ असा पराभव केला.
प्रत्येक सत्रात भारताने एका गोलची नोंद केली. मैदानी गोल लगावून भारताने या सामन्यात तीन गुणांची कमाई केली. रमणदीपने १८व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५०व्या मिनिटाला तलविंदर सिंगने भारताची आघाडी २-० अशी वाढवली. ६७व्या मिनिटाला इंग्लंडच्या सॅम फ्रेन्च याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत सामन्यात रंगत आणली. पण भारताच्या बचावपटूंनी इंग्लंडला सामन्यात बरोबरी मिळवून देण्याची संधी दिली नाही.
भारताला या सामन्यात चार पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकाचेही गोलमध्ये रूपांतर करणे भारताला जमले नाही. इंग्लंडने मिळालेल्या सहापैकी फक्त एका पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावला. भारताला दुसऱ्या सत्रात ४१व्या, ४२व्या आणि ४५व्या मिनिटाला असे तीन पेनल्टीकॉर्नर मिळाले. पण अमित रोहिदासला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे इंग्लंडचा गोलरक्षक गिब्सनला फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. भारताचा गोलरक्षक हरजोत सिंगने इंग्लंडचे आक्रमण थोपवून धरले. पण ६७व्या मिनिटाला भारताच्या बचावरक्षकाच्या चुकीमुळे इंग्लंडच्या खात्यावर पहिल्या गोलाची नोंद झाली.
इंग्लंडविरुद्ध भारताचा खेळ अपेक्षेप्रमाणे होऊ शकला नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक ग्रेग क्लार्क यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘भारताने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या. पण त्याचा फायदा उठवता आला नाही. इंग्लंडने भक्कम बचाव करीत भारताला कडवी लढत दिली. भारताला चेंडूवरही अधिक वेळ ताबा मिळवता आला नाही. हा पहिलाच सामना असल्यामुळे आम्ही उर्वरित सामन्यात कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. विजयी सुरुवात ही नेहमीच चांगली असते. भारताने तीन गुण मिळवल्यामुळे मी समाधानी आहे.’’