IND vs ENG 5th T20I Highlights in Marathi: अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १५० धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माने या सामन्यात १३५ धावांची धुव्वाधार खेळी केली. अभिषेक शर्मा फक्त शतक झळकावून थांबला नाही तर त्याने एकाच षटकात २ विकेट्स घेत विक्रम केला आहे. तर मोहम्मद शमीने ३ विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने दिलेल्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या ९७ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एकट्या अभिषेक शर्माने १३५ धावांची वादळी खेळी केली. इंग्लंडचे ११ खेळाडूही १३५ धावांचा टप्पा गाठू शकला नाही आणि १०० धावांच्या आतच इंग्लिश संघ सर्वबाद झाला. मालिका आधीच काबीज केलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एकतर्फी १५० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. इंग्लंडचा धावांच्या बाबतीत हा सर्वात वाईट पराभव आहे.

भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि पहिल्याच चेंडूपासून तुफानी फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. संजू सॅमसनने पहिल्याच षटकात १६ धावा केल्या पण पुढच्याच षटकात तो बाद झाला. मात्र अभिषेक शर्माने दुसऱ्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवत आपली तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली.

अभिषेक शर्माने एकाटच इंग्लंडला पडला भारी

अभिषेकने विशेषत: जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्याविरूद्ध जोरदार फटकेबाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. टीम इंडियाने पहिल्या ६ षटकात ९५ धावा केल्या होत्या. अभिषेकची वादळी फलंदाजी सुरूच होती आणि त्याने ११व्या षटकात ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. रोहित शर्मानंतर अभिषेक शर्माने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले.

१८व्या षटकात बाद होण्यापूर्वी अभिषेकने केवळ ५४ चेंडूत १३५ धावा केल्या, ज्यात १३ षटकार आणि ७ चौकारांचा लगावले. त्याच्याशिवाय शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनीही लहान पण वेगवान खेळी खेळल्या. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने ३ विकेट घेतले.

इंग्लंडने २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात केली आणि पहिल्याच षटकात फिल सॉल्टने मोहम्मद शमीविरूद्ध २ चौकार आणि १ षटकारासह वादळी सुरूवात केली. पण त्याला दुसऱ्या टोकावरून चांगली साथ मिळाली नाही. तिसऱ्या षटकात बेन डकेटला शमीने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले, तर पाचव्या षटकातच कर्णधार जोस बटलरला वरुण चक्रवर्तीने बाद केले. सॉल्ट दुसऱ्या बाजूने फटकेबाजी करत होताच आणि त्याने २१ चेंडूत अर्धशतकही ठोकले पण बाकीचे फलंदाज वरुण आणि रवी बिश्नोईपुढे शरणागती पत्करताना दिसले.

त्यानंतर ८व्या षटकात शिवम दुबेने सॉल्टला (५५) बाद करून इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतर अभिषेकने एकाच षटकात दोन विकेट घेत इंग्लंडच्या पराभवावर शिक्कामोर्तब केला, यानंतर शमीने ११व्या षटकात सलग दोन विकेट घेत इंग्लंडला पराभूत केलं. टीम इंडियाकडून शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतले, तर दुबे, अभिषेक आणि वरुणने प्रत्येकी २ विकेट घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिका ४-१ ने आपल्या नावे केली आहे.