‘‘आकाशाकडे किंवा प्रतिस्पध्र्याकडे पाहू नका, असे मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगितले होते. जो स्वत:ला मदत करतो, देव त्यांच्याच पाठीशी असतो. देव आपल्याला वाचवायला प्रत्यक्षात येणार नाही. तुम्हाला हा प्रतिष्ठेचा चषक जिंकायचा असेल, तर आपल्याला लढायला हवे!’’.. संघनायक महेंद्रसिंग धोनीचे हे बोल भारतीय संघासाठी प्रेरणादायी ठरले. पावसाच्या ‘खो-खो’मुळे दिरंगाईने ५० षटकांऐवजी २० षटकांच्या झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा फक्त पाच धावांनी पराभव केला. एकदिवसीय क्रिकेटमधील जागतिक स्तरावरील जेतेपद जिंकण्यात इंग्लिश संघ आणखी एकदा अपयशी ठरला.
पावसाच्या वर्षांवामुळे ट्वेन्टी-२० षटकांच्या झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करीत ७ बाद १२९ धावा केल्या आणि नंतर इंग्लंड संघाला फक्त ८ बाद १२४ धावांवर सीमित राखले. भारताच्या नाटय़मय विजयात रवींद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीचा (नाबाद ३३ धावा आणि २४ धावांत २ बळी) सिंहाचा वाटा आहे. या विजयामुळे कप्तान धोनी आणखी एका ऐतिहासिक यशाचा शिल्पकार झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आयसीसीची तीन जागतिक अजिंक्यपदे जिंकणारा तो एकमेव कर्णधार ठरला आहे.
आर. अश्विनच्या शेवटच्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जेम्स ट्रेडवेल षटकार खेचण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी एक अभूतपूर्व आनंद साजरा केला. संघनायक धोनीने आनंदाने उडी मारली. सर्व खेळाडू एकमेकांना आनंदाने भेटू लागले. भारतीय क्रिकेटच्या ऐतिहासिक क्षणाच्या स्टम्प्सवर काहींनी ताबा मिळवला. भारताच्या जेतेपदाचा साक्षीदार होण्यासाठी क्रिकेटरसिकांनी मोठय़ा संख्येने स्टेडियमवर हजेरी लावली होती. मुसळधार पाऊस, सोसाटय़ाचा वारा या कशाचीही तमा न बाळगता या चाहत्यांनी आपला जल्लोष साजरा केला.
२००२मध्ये भारताने श्रीलंकेसोबत चॅम्पियन्स करंडक स्पध्रेचे संयुक्तपणे विजेतेपद प्राप्त केले होते. रविवारी पाऊस थांबण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे ५० षटकांचा खेळ कमी होत गेला. या सामन्याकरिता राखीव दिवस ठेवला नसल्यामुळे सामना झाला नसता तर भारताला आणखी एकदा संयुक्त विजेतेपदावर समाधान मानावे लागले असते. पण अखेरच्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत भारताला हे मुळीच मंजूर नव्हते. २५ जून १९८३मध्ये भारताने प्रथमच जगज्जेतेपद जिंकले होते. त्या दिवसाला ३० वष्रे पूर्ण होण्यास दोन दिवस बाकी असताना भारताने आपला जल्लोष अनोख्या पद्धतीने साजरा केला.
भारताच्या विजयामुळे जागतिक स्तरावरील जेतेपद जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न पुन्हा अधुरे राहिले. १९७९, १९८७ व १९९२च्या जगज्जेतेपदाच्या अंतिम सामन्यात इंग्लंड पराभूत झाले होते. याचप्रमाणे २००४मध्ये द ओव्हलवर विंडीजकडून पराभूत झाल्याने इंग्लंडला चॅम्पियन्स करंडकाचे उपविजेतेपद मिळाले होते.
‘‘आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. एक कर्णधार म्हणून इंग्लिश संघासाठी काहीतरी खास करू शकेन, अशा आशा मी बाळगल्या होत्या. आम्हाला ती संधी चालून आली, पण आम्ही आम्ही तिचे सोने करू शकलो नाही,’या शब्दांत कुकने आपले नैराश्य प्रकट केले.
भारतीय कप्तान धोनीसाठी हा विजय खास ठरला. २००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११चा एकदिवसीय विश्वचषक व आता चॅम्पियन्स करंडक त्याच्या खात्यावर जमा झाले. जडेजाला सामनावीर तर शिखर धवनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जगज्जेते असल्याचे दाखवून दिले -धोनी
बर्मिगहॅम : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा अंतिम सामना ५०वरून २० षटकांचा करण्यात आल्यानंतरच खरी रंगत निघून गेली होती. पण जगातील सर्वोत्तम संघाला १३० धावांचे आव्हान आम्ही पार करू दिले नाही. जगज्जेते असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले, अशा शब्दांत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जेतेपदानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
तो म्हणाला, ‘‘इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची किमया आम्ही साधली. २० षटकांच्या सामन्यात १३० धावांचे आव्हान पेलणे कठीण नव्हते. पण गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे आम्ही विजय मिळवू शकलो. रवींद्र जडेजाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विकेट्स मिळवल्या. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. सलामीवीर म्हणून शिखर धवनने आपली छाप पाडली. त्याने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेपर्यंत आपला फॉर्म कायम ठेवावा. माझ्या कर्णधारपदाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आणि आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकल्याचा अभिमान वाटत आहे.’’

संधीचे सोने करता आले नाही – कुक
बर्मिगहॅम : एक कर्णधार म्हणून फार मोठय़ा अपेक्षा होत्या. काही तरी खास आमच्या पदरी पडेल, असे वाटत होते, पण आम्हाला या संधीचे सोने करता आले नाही. परंतु ज्या पद्धतीने आम्ही मैदानात उतरलो, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही स्पर्धेत चांगले क्रिकेट खेळलो, पण अंतिम फेरीत दडपणाखाली आमच्याकडून चांगला खेळ झाला नाही, असे उपविजेते ठरलेल्या इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक याने अंतिम सामन्यानंतर सांगितले.
तो पुढे म्हणाला की, भविष्यात आम्ही याकडे नक्कीच लक्ष देऊ, भावनांवर नियंत्रण कसे ठेवता येईल, याकडेही पाहू आणि २०१५ च्या विश्वचषकासाठी पुन्हा एकदा नव्याने संघबांधणी करू. अंतिम सामन्यात इयान बेलला तिसऱ्या पंचांनी बाद दिल्याचे साऱ्यांनाच आश्चर्य वाटले होते. यावर कुक म्हणाला की, माझ्या मते हा वाईट निर्णय होता, पण तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची किंमत बेलला
मोजावी लागली.

चॅम्पियन्स विजेत्यांना बीसीसीआयचे इनाम
*  नवी दिल्ली : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या चुरशीच्या अंतिम लढतीत इंग्लंडवर मात करत जेतेपदाची कमाई करणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने भरघोस रकमेची बक्षिसे जाहीर केली आहेत. विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये आणि प्रशिक्षक आदी सहाय्यकांना प्रत्येकी ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.
धवनचा पुरस्कार उत्तराखंडमधील पूरग्रस्तांना समर्पित
*  बर्मिगहॅम : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडून ‘गोल्डन बॅट’वर मोहोर उमटवणाऱ्या शिखर धवनने आपला पुरस्कार उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समर्पित केला आहे. ‘‘उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी, पूर यामुळे तेथील जनतेचे राहणीमान कोलमडून गेले आहे. त्यांचे आयुष्य पूर्वपदावर येण्यासाठी मी माझा पुरस्कार त्यांना समर्पित करतो,’’ अशी घोषणा धवनने केली.
खेळाडूंचा रात्रभर जल्लोष
*  बर्मिगहॅम : भारतीय युवा ब्रिगेडने जेतेपद पटकावल्यावर मैदानात तर जल्लोष साजरा केलाच, याचप्रमाणे येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यावर खेळाडूंनी नवीन हिंदी आणि पंजाबी गाण्यांवर बेधुंद होऊन नृत्य केले. त्यांच्या आनंदाच्या उधाणाला कोणतीच सीमा नव्हती. खेळाडूंचा हा जल्लोष सोमवार पहाटेपर्यंत सुरू होता. विराट कोहली या जल्लोषाचे नेतृत्व करीत होता.

प्रतिक्रिया
भारत हा एक जगज्जेता संघ आहे, ज्या पद्धतीने भारताने खेळ केला, प्रत्येक सामन्यात वर्चस्व गाजवत त्यांनी विजय मिळवला, दडपणाच्या परिस्थितीवर मात केली, यावरून विश्वविजेतेपदाच्या संघाची मानसिकता लक्षात येते. याच मानसिकतेसह ते संपूर्ण स्पर्धेत खेळले. शून्यातून उभे राहण्याची क्षमता धोनीकडे आहे. यशाबरोबरची प्रसिद्धी व पराभवानंतर होणारी टीका त्याने एकाच पद्धतीने हाताळली. हे कौशल्य अद्भुत आहे.
सुनील गावस्कर, भारताचे माजी कर्णधार.

शानदार विजय. ज्या पद्धतीने भारतीय संघाने स्पर्धेवर वर्चस्व गाजवले ते पाहता भारतच जिंकणार, असेच वाटत होते. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाला पैकीच्या पैकी गुण. आयसीसीची सर्व जेतेपदे आता त्याच्या नावावर आहेत. भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी तो एक आहे. त्याच्या नेतृत्वशैलीत कोणताही बदल झालेला नाही. शांत आणि सुनियोजित पद्धतीने तो नेतृत्व सांभाळतो.
गुंडाप्पा विश्वनाथ, माजी क्रिकेटपटू

‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली होती. मात्र या दिमाखदार विजयामुळे भारतीय संघाला चाहत्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी मदत होणार आहे. जेतेपदाने मी आनंदी असून भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. भारतीय संघाने अष्टपैलू खेळ केला.संदीप पाटील आणि निवड समितीच्या कर्तृत्वाला सलाम. युवा संघाच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास ठेवला.
अंशुमन गायकवाड, माजी खेळाडू.

चॅम्पियन्स करंडक विजेता संघ आणि १९८३ विश्वचषक विजेता संघ यांच्यात खूपच साधम्र्य आहे. दडपणाच्या काळात आम्ही चांगली कामगिरी केली होती आणि या संघानेही तसेच केले. १९८३च्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीत कमी धावसंख्येचा सामना झाला होता. १९८३ च्या विश्वचषक विजेता संघ आणि चॅम्पियन्स करंडक विजेता संघ यांच्यात मोठे साम्य आहे. दोन्ही संघाचे कर्तृत्त्व विशेष कौतुकास्पद आहे.
चंदू बोर्डे, माजी कर्णधार.

भारतात अफाट गुणवत्ता आहे आणि वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीचा संघाच्या विजयी कामगिरीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे या विजयाने सिद्ध झाले. हा दैदीप्यमान विजय होता. धोनीच्या नेतृत्वाला सलाम. तो भारताचा सवरेत्कृष्ट कर्णधार आहे. सचिन, द्रविड असे दिग्गज खेळाडू नसतानाही त्याने युवा संघाची बांधणी केली. हा एक परिपूर्ण संघ आहे आणि धोनी भारताचा सर्वोत्तम कप्तान आहे.
अजित वाडेकर, माजी कर्णधार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat england by 5 runs to win icc champions trophy