IND vs ENG 1st ODI Highlights in Marathi: शुबमन गिलची ८७ धावांची खेळी, श्रेयस अय्यरची वादळी आणि महत्त्वपूर्ण फटकेबाजी, संकटमोचक अक्षर पटेलचं अर्धशतक अन् भारताच्या गोलंदाजांची भेदक गोलंदाजी यासह भारतीय संघाने इंग्लंड संघावर पहिल्या वनडेत सहज विजय मिळवला आहे.इंग्लंडवरील ५ विकेट्सने मिळवलेल्या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चांगल्या लयीत असल्याचे दाखवून दिले आहे.नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेला इंग्लंड २४८ धावा करत ४७.४ षटकांत सर्वबाद झाला. तर भारताने ३८.४ षटकांत इंग्लंडवर ५ विकेट्सने विजय नोंदवला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया दीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळत होती. पण भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करत टीम इंडिया तयारीत असल्याचे दिसत आहे. यापूर्वी, भारतीय संघाने जुलै-ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर ३ एकदिवसीय सामने खेळले होते, जी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यानंतर भारताची पहिली आणि एकमेव एकदिवसीय मालिका होती.
इंग्लंडचा संघ २४८ धावांवर सर्वबाद
भारतीय संघाने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत मोहम्मद शमीने दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या बाजूने इंग्लिश सलामीवीराने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षित राणाची चांगलीच धुलाई केली. फिल सॉल्ट आणि बेन डकेटने अवघ्या ९ षटकांत ७५ धावा करत जोरदार सुरूवात केली. पण फिल सॉल्ट धावबाद झाल्यानंतर टीम इंडियाने पुनरागमन केलं. यात हर्षितची महत्त्वाची भूमिका महत्त्वाची होती. त्याने आधी बेन डकेट (३२) आणि नंतर हॅरी ब्रूक (०) यांची विकेट घेतली. रवींद्र जडेजाने पुन्हा जो रूटला (१९) आपला बळी बनवले.
मधल्या फळीत कर्णधार जोस बटलरसह युवा अष्टपैलू जेकब बेथलने संघाचा डाव उचलून धरला. प्रथम बटलरने (५२) अर्धशतक झळकावले आणि नंतर तो बाद झाल्यानंतर जेकब बॅथल (५१) यांनी संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले मात्र तोही जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. शेवटी, जोफ्रा आर्चरने (२१) काही मोठे फटके मारले आणि संघाला २४८ धावांपर्यंत नेले. हर्षित आणि जडेजाने प्रत्येकी ३ विकेट घेतले, तर शमी, अक्षर आणि कुलदीप यादव यांना १-१ विकेट मिळवण्यात यश मिळाले.
२४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रोहित शर्माने सुरूवात केली. पण आर्चर आणि साकिब महमूद यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर फारश्या धावा दोघांना करता आल्या नाहीत आणि दोघेही झेलबाद होत माघारी परतले. कर्णधार रोहितने (२) पुन्हा एकदा निराशा केले. कसोटी फॉर्मेटमध्ये त्याचा खराब फॉर्म वनडेमध्येही कायम राहिला.
श्रेयस अय्यरचं ‘वादळी’ पुनरागमन
रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या श्रेयस अय्यरने आक्रमक सुरूवात केली आणि भारतीय संघात पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं. श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार खेळी करत विजयाचा पाया रचला. विशेषतः, अय्यरने येताच आक्रमक फलंदाजी केली आणि आर्चरच्या षटकात २ षटकार आणि १ चौकारा लगावत आपले मनसुबे जाहीर केले. अय्यरने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक झळकावले पण त्याला आपल्या डावाचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही.
श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अक्षरला बढती मिळाली आणि त्याने गिलबरोबर १०८ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे विजय निश्चित झाला. अर्धशतक झळकावल्यानंतर अक्षर आदिल रशीदच्या गोलंदाजीवर बाद झाला, तर शुबमन गिल त्याच्या शतकापूर्वी ८७ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजाने संघाला विजयापर्यंत नेले.