इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेमध्ये सोमवारी भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. ५० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोमवारी ओव्हलवर भारताच्या विजयाची क्रांती घडली. मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरसह (२/२२) अन्य गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा १५७ धावांनी धुव्वा उडवला. यापूर्वी, १९७१ मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने ओव्हलवर इंग्लंडला धूळ चारली होती. यंदा विराट कोहलीच्या शिलेदारांनी हा पराक्रम करताना पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने दिलेले ३६८ धावांचे लक्ष्य गाठताना इंग्लंडचा दुसरा डाव २१० धावांत आटोपला. भारताच्या दुसऱ्या डावातील शतकवीर रोहित शर्मा सामनावीर ठरला. पाचवी कसोटी १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे खेळवण्यात येईल. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने केलेलं एक ट्विट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत असून त्याने या विजयाचा आनंद शेअर करताना इंग्लंडचा ट्रोल करण्यासाठी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरलाय.
नक्की पाहा हे फोटो >> आईच्या भीतीपोटी लागलेल्या सवयीमुळे बुमरा आज झालाय ‘यॉर्कर किंग’
रविवारच्या बिनबाद ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्सचा (५०) अडथळा दूर केला. डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला. १४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली. जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो (०) आणि ऑली पोप (२) यांना त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. मात्र शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला.
नक्की वाचा >> “लंच ब्रेकनंतर बुमरा माझ्याकडे आला आणि म्हणाला…”; सामन्याला कलाटणी देणाऱ्या त्या क्षणाबद्दल विराटचा खुलासा
ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हर्टन (१०) यांनी थोडा वेळ भारताचा विजय लांबवला. मात्र उमेश यादवने या दोघांना माघारी पाठवले. अखेर ९३व्या षटकात उमेशनेच जेम्स अँडरसनला बाद केले आणि कोहलीसह सर्व खेळाडू आणि स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारताच्या या विजयानंतर ऑन आणि ऑफ द फिल्डही जबरदस्त सेलिब्रेशन झालं. अनेकांनी ट्विटरवरुन भारतीय संघाचं कौतुक केलं.
नक्की वाचा >> समजून घ्या : बुमराच्या घातक यॉर्करमागील तंत्र; कोणत्याही फलंदाजाला क्रीज टीकून राहणंही का होतं मुश्कील?
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही या सामन्यानंतर काही ट्विट केलेत. एका ट्विटमध्ये संघाचा फोटो पोस्ट करत सेहवागने, “पुनरागमन करुन सातत्याने जिंकणाऱ्या संघाला भारतीय संघ म्हणतात. भारतीय संघाचा फार अभिमान वाटतोय,” असं म्हटलं आहे.
Comeback karke consistently jeetne waale ko #TeamIndia kehte hain.
So proud of this Team #ENGvIND pic.twitter.com/cEJUvLvpeX
— Virender Sehwag (@virendersehwag) September 6, 2021
या ट्विटसोबतच सेहवागने अन्य एका ट्विटमध्ये इंग्लंडचा संघ आणि त्यांच्या समर्थकांना ट्रोल केलं आहे. भारतीय संघ सपाट खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करु शकणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी हा अंदाज चुकीचा ठरवत इंग्लंडच्या संघाला ऑल आऊट करण्याचा पराक्रम केला. त्यावरुनच टोला लगावताना सेहवागने पंतप्रधान मोदींचा फोटो पोस्ट केलाय. “भारतीय संघ फक्त फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर जिंकू शकतो असा दावा करणाऱ्यांना आता भारतीय संघ हेच सांगू इच्छित असेल,” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आलीय. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदी फोनवर बोलताना दिसत असून फोटोवर, “आप लोग रोना बंद किजिये” असं वाक्य लिहिलेलं आहे. सेहवागने ट्विट केलेला हा फोटो सध्या व्हायरल झालाय. ५ हजार ४०० हून अधिक जणांनी हा फोटो रिट्विट करुन शेअर केलाय.
नक्की पाहा >> एक विजय अन् पाच विक्रम… विराट ‘सर्वश्रेष्ठ’ कर्णधार; रिकी पाँण्टींगला मागे टाकत केला ‘हा’ विश्वविक्रम
Team India to all those who thought India is winning on Turning tracks in India and were quick to write off the team.
Respect! pic.twitter.com/fRbUqNGIaX— Virender Sehwag (@virendersehwag) September 6, 2021
कधीचा आहे हा फोटो?
सेहवागने ट्विट केलेला हा फोटो पंतप्रधानांनी मागील महिन्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये अगदी थोड्या फरकाने पदक गमावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाशी संवाद साधतानाचा आहे. पंतप्रधानांनी भारतीय महिला संघाच्या सदस्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्याचं अभिनंदन करण्यासाठी फोन केला असता चौथ्या स्थानावर राहिल्याने पदक हुकल्याच्या दु:खात भारतीय महिला संघाच्या खेळाडूंना रडू आलं. त्यावेळी मोदींनी त्यांना रडू नका तुम्ही फार छान खेळला आहात, आम्हा सर्वांना तुमचा फार अभिमान आहे, असं सांगितलं होतं. त्यामधीलच या वाक्याचा सेहवागने अगदी भन्नाट जागी उपयोग करत भारतीय संघाच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलंय.