पॉल व्हॅन अ‍ॅस यांची हकालपट्टीनंतर मानसिक खच्चीकरण झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने युरोपियन दौऱ्यातील पहिल्याच लढतीत फ्रान्सवर २-० असा विजय साजरा केला.  अ‍ॅस यांच्या हकालपट्टीनंतर भारताच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी उच्च कामगिरी व्यवस्थापक रोलँट ओल्टमन्स यांच्यावर सोपविण्यात आली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील भारताचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात भारत फ्रान्सविरुद्ध दोन आणि स्पेनविरुद्ध तीन सामने खेळणार आहे. खचलेल्या मानसिकतेत येथे दाखल झालेल्या भारतीय संघाने रिओ ऑलिम्पिक स्पध्रेच्या तयारीवर कोणताही परिणाम होऊ न देण्याच्या निर्धाराने सोमवारी खेळ केला. त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबविला आणि चिंग्लेनसाना सिंगने गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली.
‘शताब्दी एक्स्प्रेस’ म्हणून ओळख असलेल्या एस. व्ही. सुनीलने दमदार पुनरागमनाची चाहुल दाखवली. पाच मिनिटांनमध्येच सुनीलने भारतासाठी दुसरा गोल केला आणि मध्यंतरापर्यंत २-० अशी आघाडी निश्चित केली. तिसऱ्या सत्रात फ्रान्सकडून आक्रमक खेळ झाला, परंतु भारताच्या बचावपटूंना भेदण्याचे सूत्र त्यांना सापडले नाही. अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनाने भारतीय संघ मजबूत झाला होता. तिसऱ्या सत्राच्या अखेरच्या क्षणाला फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, गोलरक्षक पी.आर. श्रीजेश याने त्यांचा गोल करण्याचा प्रयत्न हाणला. एकदा नव्हे, तब्बल पाच वेळा श्रीजेशने फ्रान्सच्या खेळाडूंचे गोल करण्याचे प्रयत्न अपयशी ठरवले. सुरुवातीच्या आक्रमक खेळानंतर मजबूत बचावाचा नजराणा सादर करताना भारताने फ्रान्सला अखेपर्यंत गोल करण्यापासून रोखले आणि २-० असा विजय निश्चित केला.