इंग्लंडवर २-१ असा विजय; मनदीप आणि हरमनप्रीतचे गोल
उत्कंठापूर्ण सामन्यात भारताने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले आणि चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत विजयाची बोहनी केली. पहिल्या सामन्यात त्यांनी जर्मनीला बरोबरीत रोखले होते.
भारताकडून मनदीपसिंगने १७व्या मिनिटाला खाते उघडले, तर ३४व्या मिनिटाला हरमनप्रितसिंगने पेनल्टी स्ट्रोकद्वारा गोल करत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. इंग्लंडच्या अ‍ॅश्ले जॅक्सनने ३५व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारा गोल केला.
सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडच्या खेळाडूंनी धारदार चाली केल्या. त्यांना पहिल्या तीन मिनिटांमध्ये लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र भारताचा गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने या दोन्ही चाली शिताफीने परतविल्या. पहिल्या १५ मिनिटांमध्ये बराच वेळ इंग्लंडच्या खेळाडूंकडेच नियंत्रण होते. दुसऱ्या डावाच्या प्रारंभापासून भारतीय खेळाडूंना सूर गवसला. सामन्याच्या १७व्या मिनिटाला भारताच्या एस. व्ही. सुनीलने मुसंडी मारून गोलपोस्टच्या दिशेने चेंडू तटविला. मनमितसिंगने चपळाईने चाल करीत हा चेंडू गोलमध्ये मारला व भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा दोन मिनिटांनी भारताला गोल करण्याची हुकमी संधी चालून आली होती. मात्र मनमितची चाल इंग्लंडच्या बचावरक्षकांनी रोखून धरली. इंग्लंडच्या खेळाडूंनीही चांगल्या चाली केल्या, मात्र पूर्वार्धात भारतानेच १-० अशी आघाडी टिकविण्यात यश मिळविले.
सामन्याच्या उत्तरार्धातही भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ३३व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. मात्र त्यांना पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही चाल रोखताना इंग्लंडच्या खेळाडूकडून चूक झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. हे अपील मान्य करीत पंचांनी पेनल्टी स्ट्रोक भारताला दिला. त्याचा फायदा घेत हरमानप्रितसिंगने अचूक गोल केला व संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. या आघाडीचा आनंद भारतास फार वेळ टिकविता आला नाही. इंग्लंडच्या अ‍ॅश्ले जॅक्सनने वेगवान चाल करीत गोल केला व ही आघाडी कमी केली. सामन्याच्या शेवटच्या पाच मिनिटांत इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. भारताने पहिल्या सामन्यात बलाढय़ जर्मनीस ३-३ असे बरोबरीत रोखले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा