पाचव्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. आपल्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिलांनी जपानच्या संघावर ४-१ ने मात करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. नवनीत कौरने या सामन्यात हॅटट्रीक करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याव्यतिरीक्त अनुपा बर्लानेही भारताकडून चौथा गोल नोंदवला.
जपानी महिलांचा संघ हा आपल्या मजबूत बचावासाठी ओळखला जातो. मात्र भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलं. पहिल्या सत्रात वंदना कटारिया आणि लिलिमा मिन्झ यांनी सुरेख चाली रचत जपानच्या बचावफळीला खिंडार पाडलं. नवनीत कौरनेही यादरम्यान आपली छाप पाडत सामन्यात ७, २५ आणि ५५ व्या मिनीटाला गोल झळकावले. संपूर्ण सामन्यात भारतीय महिलांनी आपल्या खेळातली गती कमी होऊ दिली नाही. याचसोबत संघाची गोलरक्षक आणि कर्णधार सुनिता लाक्राच्या भक्कम बचावासमोर जपानची डाळ काही केल्या शिजली नाही.
जपानकडून अकी यामाडाने ५८ व्या मिनीटाला गोल झळकावला, मात्र तोपर्यंत भारताने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. चमकदार कामगिरीसाठी नवनीत कौरला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. भारतीय महिलांचा पुढचा सामना १६ जूनरोजी चीनच्या महिला संघाविरुद्ध होणार आहे.