चेन्नई : कमालीच्या वेगवान झालेल्या सामन्यातील अखेरच्या सत्रात प्रतिस्पर्धी दक्षिण कोरियाचा प्रतिकार मोडून काढत भारताने सोमवारी आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत ३-२ असा विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत अपराजित राहिला असून, तीन विजय आणि एका अनिर्णित सामन्यासह १० गुणांनी गुणतालिकेत आघाडीचे स्थान मिळवले आहे. भारताचा अखेरचा सामना बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. अन्य एका सामन्यात मलेशियाने जपानचा ३-१ असा पराभव करून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. 

कोरियाविरुद्ध सहाव्याच मिनिटाला निलकांत शर्माने मैदानी गोल करून भारताला आघाडीवर नेले. या पहिल्याच सत्रात किम सुंगह्युनने कोरियाला बरोबरी करून दिली. कोरियाला यानंतर गोलसाठी ५८व्या मिनिटाची वाट पाहावी लागली. यांग जिहुनने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यापूर्वी दुसऱ्या सत्रात हरमनप्रीत सिंगने कॉर्नरवर गोल करून भारताला आघाडीवर नेले. मध्यंतरानंतर मनदीपने उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच ३३व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी भक्कम केली. मात्र, सामन्यातील अखेरचे सत्र कमालीचे वेगवान झाले. यातही कोरियाच्या वेगवान चाली आणि काही वेळा धडकी भरवणारी आक्रमणे थोपवताना भारताच्या बचावफळीची कसोटी लागली. सामन्याची अखेरची दहा मिनिटे श्वास रोखणारी ठरली. यामध्ये कोरियाने दहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. त्यापैकी केवळ एकच त्यांना सत्कारणी लावता आला. भारताचा बचाव आणि गोलरक्षक श्रीजेशची भूमिका निर्णायक ठरली. या अखेरच्या मिनिटांच्या खेळात भारताला एक पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. या स्ट्रोकवर कर्णधार हरमनप्रीतला गोल करण्यात अपयश आले. मात्र, बचाव फळीच्या निर्णायक कामगिरीने भारताचा विजय साकारला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat korea enter asian champions trophy semi finals zws
Show comments