मलेशियन खेळाडूंनी शेवटच्या मिनिटापर्यंत भारताला झुंजविले मात्र भारताने हा सामना ३-२ असा जिंकून विश्वचषक हॉकी स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. त्याचे श्रेय दोन गोल करणाऱ्या आकाशदीप सिंग याला द्यावे लागेल.
मलेशियाविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड होते, तरीही भारतास हा सामना जिंकण्यासाठी शर्थीची लढत द्यावी लागली. त्यांच्या विजयात आकाशदीप सिंग याने दोन गोल करीत सिंहाचा वाटा उचलला. जसप्रीतसिंग याने एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. मलेशियाकडून रेझी अहमद रहीम व मरहान जलील यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतास पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे बेल्जियम व इंग्लंड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तिसऱ्या लढतीत त्यांनी स्पेनविरुद्ध १-१ अशी बरोबरी केली होती.
भारताने मलेशियाविरुद्ध सुरुवात चांगली केली. १४ व्या मिनिटालाच त्यांना पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा घेत जसप्रीत याने गोल केला व संघाचे खाते उघडले. त्यानंतर दोन्ही संघांनी अनेक चाली केल्या मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. पूर्वार्धात भारताकडे १-० अशी आघाडी होती.
उत्तरार्धात मलेशियाच्या खेळाडूंनी धारदार आक्रमणास सुरुवात केली. त्यांच्या या डावपेचांना लगेच यश मिळाले. सामन्याच्या ४६ व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रेझी याने गोल केला व १-१ अशी बरोबरी केली. ही बरोबरी फार वेळ टिकली नाही. ४९ व्या मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत आकाशदीप याने गोल करीत संघास पुन्हा आघाडीवर नेले. त्यानंतर आक्रमक चाली करीत भारतीय खेळाडूंनी मलेशियावर दडपण आणले.
सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला भारताचा कर्णधार सरदारासिंग याने मलेशियाच्या बचावरक्षकांना चकवीत आकाशदीपकडे पास दिला. त्यावर कोणतीही चूक न करता आकाशदीपने गोलमध्ये चेंडू तटविला व संघास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला मलेशियाने जोरदार चाल केली व गोल करण्यात यश मिळविले. त्यांच्या मरहान जलील याने भारतीय बचावरक्षकांना चकवीत गोल केला व सामन्यात रंगत आणली. तथापि, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मलेशियन खेळाडूंच्या चाली थोपविल्या. या सामन्यात भारतास चार पेनल्टी कॉर्नर मिळाले तर मलेशियास पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. हा सामना जिंकून भारताने तीन गुणांची कमाई केली आहे. साखळी गटातील शेवटच्या सामन्यात त्यांना बलाढय़ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. हा सामना सोमवारी होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा