बचावपटू जेरी लालरिनझुअलाच्या शानदार गोलच्या जोरावर भारताने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ १६ वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत नेपाळवर १-० मात करत जेतेपदावर नाव कोरले. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या विभागीय अकादमीच्या संघाने भारताचे प्रतिनिधित्व केले. काठमांडूमधील दशरथ मैदानावर झालेल्या अंतिम मुकाबल्यात १८व्या मिनिटाला लालरनिझुअलाने डाव्या पायाने जबरदस्त गोल करत भारताचे खाते उघडले. या गोलनंतर नेपाळच्या पाठीराख्यांमध्ये शांतता पसरली. भारतातर्फे झालेला हा एकमेव गोलच विजयाचा शिल्पकार ठरला. भारताने स्पर्धेतील सर्व सामन्यांत विजय मिळवत अखंडित वर्चस्व गाजवले.
पावसाळी वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर झालेल्या या लढतीत भारतीय संघाने खेळ सुरू झाल्यापासून जबाबदारीने खेळ केला. मैदानावरील परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी खेळ केला. मिझोरामच्या १४ वर्षीय लालरनिझुअलाने महत्त्वपूर्ण गोल करत वाढदिवशी फुटबॉल रसिकांना विजयाची अनोखी भेट दिली. चेंडूवर नियंत्रण मिळवत, पासिंगचे उत्कृष्ट कौशल्य सादर करणाऱ्या १८व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. मध्यंतराला १-० आघाडीवर असणाऱ्या विश्रांतीनंतरही चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा राहिला, मात्र आणखी गोल झळकावण्यात भारताला अपयश आले. लालरनिझुअलाने झळकावलेली फ्री किक गोलपोस्टच्या बाहेरच्या दिशेने गेली. ६६व्या मिनिटाला मध्यरक्षक दीपेंद्र सिंग नेगीचा गोल करण्याचा प्रयत्न नेपाळच्या भक्कम बचावामुळे फसला.
दुसऱ्या सत्रात नेपाळच्या खेळाडूंनी गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. जयानंदा सिंगने ८४व्या मिनिटाला एक गोल वाचवला तर गोलरक्षक धीरज सिंगने नेपाळच्या आघाडीपटूंचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले.
आमची कामगिरी चांगली होत आहे याचा हा विजय हे प्रतीक आहे. देशभरातल्या युवा खेळाडूंना एकत्र आणत आम्ही सुरुवात केली होती. आजचा विजय हा जबरदस्त सांघिक प्रयत्नांचे यश आहे.
या विजयाने आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. नेपाळचे समर्थन करणाऱ्या २०,००० प्रेक्षकांसमोर भारतीय खेळाडूंनी अफलातून प्रदर्शन केले अशा शब्दांत प्रशिक्षक गौतम घोष यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रीय प्रशिक्षक विम कोव्हरमन्स आणि कर्णधार सुनील छेत्री यांच्या मार्गदर्शनाचा संघाला खूप फायदा झाल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा