IND vs NZ Highlights in Marathi: श्रेयस अय्यरची ७९ धावांची खेळी, वरूण चक्रवर्तीचे ५ विकेट्स व फिरकीपटूंची भेदक गोलंदाजी या जोरावर भारताने न्यूझीलंडला नमवत ४४ धावांनी मोठा विजय नोंदवला. भारताच्या फिरकीपटू चौकडीने ९ विकेट्स घेत किवीच्या धावांना वेसण घातलं. या विजयासह भारताने गुणतालिकेत पहिलं स्थान गाठलं आहे. टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीत गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. यासह भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळवला जाणार आहे.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी २ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या गट सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. उपांत्य फेरीतील ४ संघ आधीच ठरले होते पण आता कोणता संघ कोणत्या संघाविरूद्ध खेळणार हे निश्चित होणं बाकी होत आणि ते भारत-न्यूझीलंड सामन्याच्या निकालावर ठरणार होते. यासह आता उपांत्य फेरीचे संघ ठरले असून भारत वि. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका हे संघ असणार आहेत.
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरी नाणेफेक गमावली पण सलग तिसरा सामना मात्र जिंकला आहे. नाणेफेक गमावत भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता आणि भारताची सुरूवात खूपच खराब झाली. भारताने ३० धावांमध्ये ३ विकेट गमावले होते. यानंतर श्रेयस अय्यरने अक्षर पटेलच्या साथीने ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयस अय्यरने ७९ धावांची तर अक्षर पटेलने ४२ धावांची खेळी केली. न्यूझीलंडकरून वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेत भारताला जास्त धावा करण्याची संधी दिली नाही.
भारताने दिलेले २५० धावांचे लक्ष्य न्यूझीलंड सहज गाठेल असं वाटत होते. पण भारताने मोठी खेळी करत ४ फिरकीपटू खेळवले आणि किवी संघ फिरकीसमोर फेल ठरले. न्यूझीलंडचा फक्त केन विल्यमसन १२० चेंडूत ७ चौकारांसह ८१ धावा करत बाद झालाय याशिवाय कोणताही फलंदाज ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी किवी संघाला एकेका धावेसाठी मेहनत करायला लावली. अखेरीस भारताने न्यूझीलंडला सर्वबाद करत मोठा विजय नोंदवला.
3/3 ✅ #TeamIndia will face Australia in the first Semi Final
— BCCI (@BCCI) March 2, 2025
Scoreboard ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/QxG9ZWeVMN
भारताकडून वरूण चक्रवर्तीने १० षटकांत ४२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तर अक्षर, जडेजा, हार्दिकने प्रत्येकी १-१ विकेट तर कुलदीपने २ विकेट्स घेतल्या. आपला पहिला चॅम्पियन्स ट्रॉफी सामना खेळत असलेल्या वरूणने भेदक गोलंदाजी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.