India vs New Zealand 2nd ODI Match Updates: भारतीय संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा आणि त्या स्टेडियममधील पहिला सामना शनिवार (२१ जानेवारी) रायपूरमध्ये शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. त्यात भारतीय संघाने गोलंदाजांच्या जोरावर अक्षरशःकिवींची दाणादाण उडवली. तब्बल ८ गडी राखून रायपूरचा सामना जिंकत मालिका खिशात घातली. रायपूरमध्ये खेळला जाणारा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असून भारतीय खेळाडूंना देखील याठिकाणी खेळण्याचा अनुभव नव्हता तरी देखील सामन्यात पूर्णपणे पहिल्या चेंडूपासून टीम इंडियाचे वर्चस्व पाहायला मिळाले. मोहम्मद शमीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाचा कर्णधार पुन्हा एकदा नशीबवान ठरला आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यादरम्यान रोहित २० सेकंदासाठी विसरला की नक्की काय घेऊ…फलंदाजी घेऊ की गोलंदाजी? त्याच्या या गोंधळामुळे न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमलाही काही सुचेना की रोहित असा करतो आहे. पण त्याचा वेळ घेऊन घेतलेला निर्णय योग्य होता हे सामन्याच्या निकालावरून स्पष्ट झाले.

न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३४.३ षटकांत सर्वबाद १०८ धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी १०९ धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडने ठेवलेल्या १०९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या सलामी जोडीनेच ७२ धावा करत टीम इंडियाला विजयनजीक नेले आणि त्यानंतर आलेल्या इशानने शुबमनसोबत भारताला ८ गडी राखून विजय मिळवून दिला, कर्णधार रोहित शर्माने जलवा दाखवत आपले दमदार अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४९ चेंडूत ५१ धावा केल्या. हेन्री शिपलेने त्याला पायचीत करत बाद केले. तर त्याचा साथीदार मागील सामन्यातील शुबमन गिलने ५३ चेंडूत ४० धावांचे योगदान दिले. विराट कोहलीने ९ चेंडूत ११ धावा करून त्याला मिचेल सेंटनरने बाद केले. इशान किशन ८ धावा करून नाबाद राहिला.

मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर किवींना धक्का दिला. पहिले चार चेंडू वेगवेगळ्या शैलीचे फेकल्यानंतर शमीने पाचवा चेंडू भन्नाट वळवला अन् फिन अ‌ॅलनला काही कळण्याआधी यष्टिंवर आदळला. किवींना शून्य धावांवर पहिला धक्का बसला. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील शमीची ५० वी विकेट ठरली अन् अशी कामगिरी करणारा तो भारताचा १५ वा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात किवींना दुसरा धक्का देताना हेन्री निकोल्सला ( २) माघारी पाठवले.

हेही वाचा: AUS vs PAK: रोहितच्या सुस्तीची मुनीबाला देखील झाली लागण, स्टाइल मारणाऱ्या पाकिस्तानी विकेटकीपरचा पाय घसरला अन्… Video व्हायरल

त्यानंतर शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर डॅरिल मिचेलचा (२) रिटर्न झेल घेतला. ८ षटकानंतर कर्णधार रोहितने गोलंदाजीत बदल केला. हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने मारलेला सरळ फटका हार्दिकने डाव्या हाताने अप्रतिमरित्या टिपला. किवी फलंदाजालाही यावर विश्वास बसेनासा झाला. त्यानंतर शार्दूलने कर्णधार टॉम लॅथमला (१) माघारी पाठवले अन् किवींची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली.

न्यूझीलंड संघाचे ५ फलंदाज अवघ्या १५ धावांवर गारद झाले. न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ५ खेळाडू इतक्या स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यामुळे या संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील शतकवीर मायकेल ब्रेसवेल व ग्लेन फिलिफ्स यांनी ४१ धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडची गाडी रुळावर आणली होती. ही जोडी तोडण्यासाठी रोहितने पुन्हा गोलंदाजीत बदल केला अन् दोन बळी घेणाऱ्या शमीला आणले. शमीने पहिल्या दोन चेंडूंवर ब्रेसवेलला चौकार मारू दिले अन् तिसरा चेंडू बाऊन्सर फेसला. ब्रेसवेल त्यावरही फटका मारण्यासाठी गेला अन् चेंडू बॅटला घासून यष्टिरक्षक इशान किशनच्या हाती विसावला. ब्रेसवेल २२ धावांवर माघारी परतला. फिलिप्स व मिचेल सँटनर ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे चित्र दिसत असताना हार्दिकने गडी बाद करून दिला. सँटनरला (२७) त्रिफळाचीत करून हार्दिकने ४७ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

हेही वाचा: Australian Open 2023: “अरे काही लाज…” भर सामन्यात झोपा काढता का म्हणत अंपायरला अ‍ॅलिसन रिस्के अमृतराजने दाखवले दिवसा तारे

या सामन्यात भारतीय संघाकडून गोलंदाजीचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्याने ६ षटकांत १८ धावा दिल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि वाशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २ गडी बाद केले. तसेच मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि कुलदीप यादव या गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India beat new zealand by a whopping 8 wickets in the second match of the three match odi series taking a 2 0 lead in the series avw
Show comments