IND vs PAK Highlights In Marathi: विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे. विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वत: चे शतकही पूर्ण केले आहे.
विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा २४२ धावांचे लक्ष्य कोणत्याही अडचणीशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले. टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता, ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे.
भारतीय संघाने आपल्या विजयासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आपली जागा जवळपास पक्की केली आहे. याशिवाय भारतीय संघ अ गटाच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. प्रथम भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळ करत पाकिस्तानला कमी धावसंख्येपर्यंत रोखले, त्यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत सामन्यावर कब्जा केला.
२४२ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. रोहितने २० धावांचे योगदान दिले. तर शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. याशिवाय श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. अय्यरने ६७ चेंडूत ५६ धावा करत अर्धशतकी खेळी केली. तर विराट कोहलीने या सामन्यात दमदार शतक झळकावून पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. कोहलीने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी खेळून पाकिस्तानला खिंडार पाडले. विराट कोहलीने शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरसह मोठी भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचत विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले. त्याच्याशिवाय हार्दिक पांड्याने २ विकेट घेतले.
तत्पूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सुरूवातीला योग्य ठरत होता कारण, टीम इंडियाला सुरुवातीला विकेटसाठी थोडी वाट पहावी लागली. बाबर आझम येताच त्याने काही उत्कृष्ट फटके मारत पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा चांगली सुरुवात करून दिली. पण हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेताच त्याचा सलामीचा जोडीदार इमाम उल हकही पुढच्याच षटकात बाद झाला. इथून पाकिस्तानी संघ अडचणीत दिसत होता पण कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी उत्कृष्ट भागीदारी करत संघाला सांभाळले. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली.
रिझवान शकीलने ११ ते २० षटकांत मिळून अवघ्या २७ धावा केल्या आणि भारताच्या गोलंदाजीपुढे त्यांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही. सौद शकीलने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले पण रिझवान लवकर बाद झाला. दोघेही बाद झाल्यानंतर खुशदिल शाहने शेवटी काही मोठे फटके मारले आणि संघाला २४१ धावांपर्यंत पोहोचवले.