दक्षिण आफ्रिकेवर ५-२ अशी मात, गटात दुसऱ्या स्थानावर समाधान

भारतीय महिलांच्या संघाने ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५-२ असा पराभव करून युवा (१८ वर्षांखालील) ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील हॉकी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. अर्जेटिनाविरुद्ध एकमेव पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला गटात १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

भारतातर्फे मुमताझ खानने दोन, तर रीट, लार्लेमसिआमी आणि इशिका चौधरी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला. सामन्याच्या सुरुवातीलाच भारतीय महिलांनी आक्रमणावर भर दिला. मुमताझने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. मात्र आफ्रिकेच्या कायला डी वालने १०व्या मिनिटाला गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. रीटने पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटात गोल करून मध्यांतराला भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या सत्रात लार्लेमसिआमीने (१२वे मिनिट) संघासाठी तिसरा व वैयक्तिक पहिला गोल नोंदवून आघाडी वाढवली. इशिकानेही पुढच्याच मिनिटाला गोल करून भारताचा विजय जवळपास निश्चित केला. मुमताझने १७व्या मिनिटाला संघासाठी पाचवा गोल करून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. आफ्रिकेतर्फे अँजेला वेलहॅमने दुसरा गोल नोंदवला. मात्र तोपर्यंत त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले होते.

अंतिम फेरी गाठणाऱ्या सेनचे ‘लक्ष्य’ विजेतेपद

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या भारताचा युवा खेळाडू लक्ष्य सेनने शुक्रवारी युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

सेनने जपानच्या कोडाई नाराओकाचा संघर्षपूर्ण सामन्यात १४-२१, २१-१५, २४-२२ असा पराभव केला. अंतिम लढतीत विजेतेपदाचे लक्ष्य गाठण्यासाठी सेनला चीनच्या लि शिफेंगच्या आव्हानाचा सामना करायचा आहे. अंतिम फेरीत त्याने विजय मिळवल्यास या स्पर्धेच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यापूर्वी प्रणॉय कुमारने सिंगापूर येथे झालेल्या २०१०च्या स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले होते.