भारतीय पुरुष हॉकी संघाने युरोप दौऱ्यातील स्पेनविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत दमदार पलटवार करताना २-० असा विजय साजरा केला. रमणदीप सिंग (१७ मि.) आणि आकाशदीप सिंग (३३ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
फ्रान्सला दोन्ही सामन्यांत पराभवाची चव चाखवणाऱ्या भारतीय संघाला स्पेनने पहिल्याच लढतीत जमिनीवर आणले. तीन सामन्यांच्या मालिकेत स्पेनने ४-१ अशा फरकाने भारताला नमवून १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु बुधवारच्या लढतीत भारताने पलटवार केला. सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने २-० असा विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीवर आणली.
चुरशीने झालेल्या दुसऱ्या लढतीत पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळास प्रारंभ केला. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. त्यामुळे पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये एकही गोल झाला नाही. अखेर १७ व्या मिनिटाला रमणदीपसिंग याने सुरेख मैदानी गोल करीत भारताचे खाते उघडले. पूर्वार्धापर्यंत भारताने ही आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात सामन्याच्या ३३ व्या मिनिटाला भारताने दुसरा गोल नोंदविला. हा गोल करण्यातही रमणदीपचा मोठा वाटा होता. त्याने दिलेल्या पासवर आकाशदीपसिंगने गोल केला. स्पेनने पिछाडीवरून गोल करण्यासाठी अनेक वेळा जोरदार चाली केल्या. त्यांना पेनल्टी कॉर्नरही मिळाला मात्र त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही.

Story img Loader