भारताने युरोपीयन दौऱ्याची सुखद सांगता करताना स्पेनविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा दिमाखदार विजयाची नोंद केली. अखेरच्या लढतीत सरदार सिंगच्या नेतृत्वाखालील भारताने स्पेनला ४-२ असे हरवले.
आघाडीपटू रमणदीप सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने मिनिटाच्या अंतराने (५०व्या आणि ५१व्या मिनिटाला) दोन गोल झळकावण्याची किमया साधली. ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंग (२४वे मि.) आणि आकाशदीप सिंग (४५वे मि.) यांनी प्रत्येकी एकेक गोल साकारला. स्पेनकडून रिकाडरे संताना (२५वे मि.) आणि झेव्हियर लीओनार्ट (४९वे मि.) यांनी गोल केले.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी तोलामोलाची लढत दिली. स्पेनला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले. गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने सावधपणे स्पेनची संधी हाणून पाडली. त्यामुळे पहिले सत्र गोलशून्य स्थितीत संपले. दुसऱ्या सत्राच्या २४व्या मिनिटाला रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये यशस्वी रुपांतर केले. परंतु पुढच्याच मिनिटाला स्पॅनिश संघ सावरला आणि रिकाडरे संतानाने भारतीय बचाव भेदून अप्रतिम गोल साकारला. दुसऱ्या सत्रात १-१ अशी बरोबरी झाली.
तिसऱ्या सत्रात श्रीजेशने पुन्हा स्पेनला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करू दिले नाही. अखेरच्या काही मिनिटांत रुपिंदरला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण त्याने ही संधी दवडली. ४५व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने स्पेनच्या बचावाची तमा न बाळगता गोल नोंदवला. चौथ्या सत्रात स्पेनच्या झेव्हियर लोनार्टने ४९व्या मिनिटाला पुन्हा बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताने आक्रमकरीत्या प्रतिहल्ला चढवला. रमणदीपने लागोपाठच्या मिनिटाला दोन गोल झळकावून भारताला  आघाडी मिळवून दिली.

Story img Loader