पाच विकेट्स राखून मात, विराट कोहली सामनावीर

अचूक मारा आणि मधल्या फळीतील दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत श्रीलंकेवर पाच विकेट्स राखून विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखदारपणे प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला १३८ धावांमध्ये रोखण्यात भारताला यश आले. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

विजयासाठी १३९ धावांचा पाठलाग करताना भारताने १६ धावांत दोन्ही सलामीवीर गमावले. पण त्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना (२५) यांनी संघाला स्थिरस्थावर करत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी रचली. मोठा फटका मारण्याच्या नादात रैनाचा झेल हवेत उडाला आणि नुवान कुलसेकराने तो अचूक टिपला.

रैना बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या युवराज सिंगने सुरुवातीपासूनच श्रींलकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. युवराजने दुसऱ्याच चेंडूवर चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतरच्या रंगना हेराथच्या १३ व्या षटकात युवराजने सलग दोन षटकार खेचले आणि श्रीलंकेकडून सामना हिरावला. युवराज फलंदाजी करत असताना भारताची धावगती अपेक्षेपेक्षा अधिक वाढली, युवराजने १८ चेंडूंमध्ये प्रत्येकी तीन चौकार आणि षटकार लगावत ३५ धावांची लौकिकाला साजेशी खेळी साकारली. युवराज बाद झाल्यावर हार्दकि पंडय़ाही (२) झटपट हजेरी लावून तंबूत परतला. एका बाजूने भारताची बाजू कोहलीने अप्रतिमरीत्या बांधली.

परिस्थिती कशीही असली तरी तो त्याला शरण गेला नाही. मैदानाच्या प्रत्येक बाजूला त्याने आपल्या फटक्याची साक्ष दिली. पंडय़ा बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचत दडपणी कमी केले. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर ‘कव्हर ड्राइव्ह’ लगावत कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. कोहलीने या सामन्यात४७ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद ५६ धावांची खेळी साकारली आणि सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीपासूनच श्रीलंकेला भारताने धक्के द्यायला सुरुवात केली. चमारा कपुगेदराने ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. भारताकडून आर. अश्विन, हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ९ बाद १३८ (चमारा कपुगेदरा ३०, आर. अश्विन २/२६, हार्दिक पंडय़ा २/२६, जयप्रीत बुमराह २/२७) पराभूत वि. भारत : १९.२ षटकांत ५ बाद १४२ (विराट कोहली नाबाद ५६, युवराज सिंग ३५; नुवान कुलसेकरा २/२१)

सामनावीर : विराट कोहली.

पुन्हा एकदा बिकट अवस्थेतून विजय मिळवला. स्वत:ला आव्हान द्यायला आवडते. मी चेंडूंचा चांगल्या रितीने सामना करत होतो आणि त्यामुळे चौकार मारून समोरच्या फलंदाजावरील दडपण कमी करत होतो.

-विराट कोहली , भारताचा फलंदाज