IND U19 vs SL U19 Semi Final Match Updates: ACC पुरुष अंडर-१९ आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. भारताच्या या शानदार विजयात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. वैभवने २४ चेंडूत अर्धशतक झळकावत भारताला विजयाच्या जवळ नेले. वैभवच्या या खेळीपूर्वी भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या धावांवर अंकुश ठेवला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय संघासाठी योग्य ठरला नाही आणि श्रीलंकेचा संघ संपूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही. श्रीलंकेचा संघ ४६.२ षटकांत अवघ्या १७३ धावांवर सर्वबाद झाला.अशारितीने श्रीलंकेने भारताला विजयासाठी १७५ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारताची जबरदस्त सुरूवात झाली.
वैभव सूर्यवंशीची सेमीफायनलमध्ये झंझावाती खेळी
वैभवने अवघ्या ३६ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची तुफान खेळी केली. सलामीवीर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी झाली. आयुष म्हात्रे ९व्या षटकात ३४ धावा काढून बाद झाला. यानंतर वैभव सूर्यवंशीने १०व्या षटकात आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. भारतीय संघाची धावसंख्या १० षटकांत १०० च्या पुढे गेली होती.
वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता पण १४व्या षटकात तो प्रवीण मनीशाच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर कर्णधार मोहम्मद अम्मान आणि सिद्धार्थ सी यांनी डाव पुढे नेला आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. विजयापूर्वी सिद्धार्थ आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला, मात्र कार्तिकेयसह कर्णधाराने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कर्णधार मोहम्मद अमानने २२ व्या षटकात षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केले. यासह, भारतीय संघ ९व्यांदा अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, जिथे ते ९व्यांदा विजेतेपदावर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा – नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटनाहेही वाचा –
भारतीय संघ अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?
ACC पुरुषांच्या अंडर-१९ अंतिम सामन्यात भारताचा सामना बांगलादेशविरूद्ध होणार आहे. अंडर-१९ आशिया कपमधील पहिला सेमीफायनल सामना बांगलादेश वि पाकिस्तान यांच्यात खेळवला गेला. पाकिस्तानचा संघ ३७ षटकांत अवघ्या ११६ धावा करत सर्वबाद झाला. तर प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने २३ षटकांत ११७ धावांचे आव्हान ३ विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह आता अंडर-१९ आशिया कपमधील अंतिम सामना हा भारत अंडर-१९ विरूद्ध बांगलादेश अंडर-१९ संघांमध्ये होणार आहे.