बोनस गुणासह भारत श्रीलंकेशी बरोबरीत
कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक ८३ चेंडूत १०२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत वेस्टइंडिज संघावर बोनस गुणासह विजय मिळविला आहे. या विजयामुळे गुणतालिकेत भारत आणि श्रीलंका संघाचे समान गुण झाले आहेत.
कॅप्टनकुल धोनी दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळणारा २४ वर्षीय युवा फलंदाज कोहलीने सामन्यात १३ चौकार व दोन षटकार लगावत शतक ठोकले. संघाची सुरूवातही चांगली झाली होती. शिखर धवनने ७६ चेंडूत ६९ धावा तर, रोहीत शर्माने ४८ धावा केल्या. सलामीसाठी या दोघांनी १२३ धावांची भागिदारी केली. भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरी केल्यामुळे भारताला ३११ धावांचे कडवे आव्हान वेस्टइंडिज संघासमोर ठेवता आले. या आव्हानासमोर वेस्टइंडीजचा डाव १७१ धावांत संपुष्टात आला. पावसामुळे व्यत्यय आलेल्या सामन्यात ३९ षटकांमध्ये २७४ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यामुळे भारताला १०२ धावांनी विजय मिळविता आला.

Story img Loader