IND vs SL 3rd T20I : भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा सुपर ओव्हर्समध्ये पराभव करत मालिका ३-० ने जिंकली. दोन्ही संघांनी निर्धारित २० षटकात आपापल्या डावात १३७ धावा केल्या होत्या. त्यामुळे निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये वॉशिंग्टन सुंदरने भारताकडून अप्रतिम गोलंदाजी करताना श्रीलंकेला फक्त २ धावांवर रोखले. यानंतर भारतासाठी फलंदाजीला आलेल्या कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. एकेकाळी श्रीलंकेला या सामन्यात विजयासाठी ३० चेंडूत ३० धावा करायच्या होत्या, पण भारताच्या डेथ ओव्हर्समध्ये रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर आणि सूर्याने शानदार गोलंदाजी करत सामन्याला कलाटणी दिली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना १३७ धावा केल्या होत्या, ज्यामध्ये शुबमन गिलने ३७ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारत महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्याच्याशिवाय रियान परागने २६ आणि वॉशिंग्टन सुंदरने २५ धावांचे योगदान दिले. टीम इंडियासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अनुभवी संजू सॅमसन या सामन्यात काही खास दाखवू शकले नाहीत, तर यशस्वी जैस्वालही अवघ्या १० धावा करून बाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 58 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली.

निसांका बाद झाल्यानंतर कुसल मेंडिस आणि कुसल परेरा यांनी संघाची धुरा हाती घेतली, त्यांच्यातील ५२ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते पण १६व्या षटकात रवी बिश्नोईने कुसल मेंडिसची विकेट घेत टीम इंडियाच्या आशा जिवंत ठेवल्या. पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने वानिंदू हसरंगा आणि चरिथ असलंका यांना लागोपाठ दोन चेंडूत बाद करून दुहेरी धक्का दिला.

हेही वाचा – Shahid Afridi : “सुरक्षा फक्त एक निमित्त…”, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये न येणाऱ्या टीम इंडियाबद्दल शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य

रिंकू-सूर्याने केली शानदार गोलंदाजी –

रिंकू सिंग हा फलंदाज आहे, पण त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीत पदार्पण केले. कारकिर्दीतील दुसऱ्याच चेंडूवर त्याने ४६ धावा करून खेळत असलेल्या कुसल परेराची विकेट घेतली. त्याच षटकात त्याने रमेश मेंडिसची विकेटही घेत भारताला सामन्यात परत आणले. दरम्यान, शेवटचे षटक सूर्यकुमार यादवने टाकले. या षटकात श्रीलंकेला ६ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या.मात्र, सूर्यकुमार यादवनेही लागोपाठ २ चेंडूत २ विकेट्स घेत अवघ्या दोन धावा खर्च केल्या. ज्यामुळे सामना शेवटच्या चेंडूवर बरोबरीत राहिला. ज्यामुळे सामना सुपर ओव्हर्समध्ये पोहोचला.

हेही वाचा – Manu Bhaker : मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्यांदा पदकावर नाव कोरल्याने आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

सुपर ओव्हर्समध्ये काय घडले?

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी श्रीलंकेसाठी कुसल मेंडिस आणि कुसल परेरा आले होते. त्याचबरोबर या षटकात गोलंदाजी करण्याची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरकडे होती. त्याने पहिल्या चेंडू वाइड टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मेंडिसने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर परेरा रवि विश्णोईच्या हाती झेलबाद झाला. यानंतर चौथ्या चेंडूवर निसांका रिंकूच्या हाती झेलबाद झाला. ज्यामुळे श्रीलंका २ धावांवरच गारद झाला आणि टीम इंडियाला ३ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतासाठी सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

Story img Loader