भारताने इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला. भारताने या सामन्याआधीच मालिका आपल्या नावे केली होती. आता टीम इंडियाने हा सामना जिंकून आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माच्या ब्रिगेडने ११२ वर्षे जुना इतिहास बदलला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ११२ वर्षांनंतर एखाद्या संघाने ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर सलग ४ सामने जिंकले. भारताने ११२ वर्षांनंतर या इतिहासाची पुनरावृत्ती केली. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता, त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत सलग ४ सामने जिंकले आणि मालिकाही ४-१ अशा फरकाने जिंकली.
इंग्लंडने १९१२ मध्ये हा इतिहास रचला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता, त्यानंतर इंग्लिश संघाने पुनरागमन करत सलग ४ सामने जिंकले. आता भारताने इंग्लंडविरुद्धच त्यांचा मोठा विक्रम मोडला आहे. इंग्लंडच्या आधी ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली होती. कांगारू संघाने १८९७-९८ आणि १९०१-०२ मध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. आता या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. पहिला सामना गमावल्यानंतर सलग ४ सामने जिंकणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे.
भारताचा पाचव्या कसोटीतील इंग्लंडविरुद्धचा विजय हा सर्वात मोठा विजय आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज शुभमन गिल यांनी धरमशाला कसोटीत शतकी खेळी खेळली. दोन्ही खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीसह सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल आणि यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामन्याच्या पहिल्या डावात ४७७ धावा केल्या. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. या सर्व फलंदाजांनंतर भारताची फलंदाजी तिसऱ्या दिवसापर्यंत नेण्याचे श्रेय कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना जाते.
इंग्लंडविरुद्ध मोठी धावसंख्या उभारल्यानंतर टीम इंडियाला २५९ धावांची आघाडी मिळाली, ज्याचा भारताने बचाव करत इंग्लंडला एका डावाने पराभूत केले. या सामन्याच्या पहिल्या डावात फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ४ तर कुलदीपने ५ विकेट घेतले. तर सामन्याच्या दुसऱ्या डावातही अश्विन आणि कुलदीप शानदार गोलंदाजी करत बॅझबॉलला गुंडाळले. अश्विनने त्याच्या १००व्या कसोटीत पाच विकेट्स मिळवल्या तर कुलदीप आणि बुमराहने प्रत्येकी २ आणि जडेजाला एक विकेट मिळाली.
पाचव्या कसोटी सामन्याच्या सामनावीराचा पुरस्कार कुलदीप यादवला मिळाला. तर मालिकावीर म्हणून युवा विस्फोटक फलंदाज आणि सर्वाधिक ७१२ धावा करणाऱ्या यशस्वी जैस्वालला मिळाला.