‘‘सातत्यपूर्ण चांगले प्रदर्शन करणाऱ्या भारतीय युवा खेळाडूंची फळी तयार होत आहे. मात्र त्यांचा दर्जा सुधारायला हवा. आमची लीग केवळ भारतीय खेळाडूंसाठी नाही. लीगच्या नावातच आंतरराष्ट्रीय शब्द आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसा खेळ असेल, तर भारतीय खेळाडूंनाही संधी मिळेल,’’ असे परखड मत भारताचा अव्वल टेनिसपटू आणि इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगचा (आयपीटीएल) संस्थापक महेश भूपतीने व्यक्त केले. आयपीटीएल स्पध्रेचा दुसरा टप्पा यंदा १० ते १२ डिसेंबर या कालावधीत नवी दिल्लीत होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर महेश बोलत होता.
‘‘सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांच्यासह लिएण्डर पेस या लीगमध्ये सहभागी होत आहेत. स्पध्रेत सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, मनिला असे संघ आहेत, परंतु या देशांचा एकही खेळाडू स्पर्धेत नाही. स्पध्रेच्या माध्यमातून अधिकाधिक भारतीय खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झाल्यास आवडेलच, परंतु त्यासाठी दर्जाशी तडजोड करता येणार नाही,’’ असे महेशने सांगितले.
अन्य लीगच्या तुलनेत आयपीटीएल खेळाडूंचा लिलाव आणि खरेदी-विक्री प्रक्रिया याविषयी गुप्तता बाळगली गेली आहे. त्याविषयी विचारले असता महेश म्हणाला, ‘‘आम्ही ड्राफ्ट पद्धती अवलंबली आहे. यामध्ये प्रत्येक खेळाडूची रक्कम आधीच निश्चित केलेली असते. खेळाडूंसाठी बोली लागत नाही. क्रमाक्रमाने प्रत्येक फ्रँचाइजीला खेळाडू निवडण्याची संधी मिळते. खेळातले दिग्गज सहभागी होत असल्याने मोठय़ा प्रमाणावर पशाची उलाढाल होणे साहजिक आहे. मात्र त्याचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रेक्षकांना खेळ आणि मनोरंजन असा सर्वसमावेशक कार्यक्रम देण्यावर आमचा भर आहे. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक ४ कोटी अमेरिकन डॉलर एवढी आहे. प्रक्षेपण हक्क-प्रायोजक-तिकीटविक्री’ ही लीगची त्रिसूत्री आहे. पहिल्या हंगामानंतर कॉर्पोरट क्षेत्राने स्वारस्य दाखवल्याने दुसऱ्या हंगामात कॉर्पोरेट बॉक्सची निर्मिती करण्यात येणार आहे.’’
‘‘प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी पाचही टप्प्यांत खेळावे अशी आमची इच्छा आहे. मात्र फेडरर किंवा जोकोव्हिचसारख्या खेळाडूंवर सर्व टप्प्यांत खेळण्याची सक्ती करता येऊ शकत नाही. ग्रँड स्लॅम तसेच अन्य स्पर्धा दूरचित्रवाणीवर पाहण्याला भारतीय चाहते पसंती देतात. मात्र प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन टेनिस पाहणारी मोजकीच मंडळी असतात. पण गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या टप्प्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त चाहते अन्य राज्यांतून आले होते,’’ अशी माहिती महेशने दिली.
सुधारित रचनेनुसार इंडियन ऐस संघाकडून राफेल नदाल खेळणार आहे. गेल्या वर्षी रॉजर फेडररने या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. संघाचे मालक शुभजित सेन म्हणाले की, ‘‘नदाल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. लीगच्या माध्यमातून नव्या हंगामासाठी सज्ज होण्याची संधी त्याला आहे. फेडररऐवजी नदालचा समावेश केल्याने चाहत्यांची प्रतिक्रिया काय असेल याबाबत साशंकता होती. मात्र समाजमाध्यमांवर मिळणारा प्रतिसाद आश्चर्यचकित करणारा आहे.’’
मुंबईत सामने नाहीत
नवी दिल्लीत इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये लीगच्या लढतींसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. या स्टेडियमची क्षमता १६,००० आहे. मुंबईतील चाहत्यांचा प्रतिसाद लक्षात घेऊन येथेही लढती खेळवण्याचा विचार केला होता. मात्र तूर्तास वरळीतील एनएससीआय वगळता पर्याय नाही. एनएससीआयची क्षमता खूपच कमी आहे. त्यामुळे मुंबईत लढती होणार नाहीत, असे इंडियन ऐस संघाचे सहमालक गुलशन झुरानी यांनी स्पष्ट केले.
संघ :
इंडियन ऐस – सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा, राफेल नदाल, अग्निझेस्का रडवानस्का, इव्हान डोडिग, फॅब्रिस सँटोरो, गेइल मॉनफिल्स
जपान वॉरियर्स- डॅनिएला हन्तुचोव्हा, केई निशिकोरी, कुरुमी नारा, लिएण्डर पेस, मारिया शारापोव्हा, व्हॅसेक पॉपसिल, मरात साफिन
फिलिपाइन्स मॅव्हरिक्स- मिलास राओनिक, जर्मिला गाजाडोसोव्हा, मार्क फिलीपॉइस, रिचर्ड गॅस्क्वेट, सबिन लिसिकी, सेरेना विल्यम्स, ट्रेट ू
सिंगापूर स्लॅमर्स- बेिलडा बेनकिक, कार्लोस मोया, डस्टिन ब्राऊन, कॅरोलिना प्लिसकोव्हा, मार्कलो मेलो, निक कुíयगास, नोव्हाक जोकोव्हिच
युएई रॉयल्स- अना इव्हानोव्हिक, डॅनिएल नेस्टर, गोरान इव्हानिसेव्हिक, क्रिस्तिना लाडेनोव्हिक, मारिन चिलीच, रॉजर फेडरर, टॉमस बर्डीच