Rohit Sharma reacts to the defeat in the first Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनमध्ये गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारताचा डाव आणि ३२ धावांनी पराभव झाला. कर्णधार रोहित शर्माने लाजिरवाण्या पराभवासाठी सामूहिक प्रयत्नांच्या अभावाला जबाबदार धरत, आपला संघ दक्षिण आफ्रिकेला आव्हान देऊ शकला नसल्याची कबुली दिली. भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत खराब कामगिरी केली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १०८.४ षटकांत ४०८ धावांत गुंडाळल्यानंतर, टीम इंडिया दुसऱ्या डावात ३४.१ षटकांत १३१ धावांत गारद झाला. पाहुण्या संघाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल –

सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, ‘आम्ही जिंकू शकलो नाही. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, केएल राहुलने चांगली फलंदाजी केली आणि आम्हाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले, परंतु नंतर आम्ही गोलंदाजीतही परिस्थितीचा फायदा घेऊ शकलो नाही. त्यानंतर फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. आम्हाला कसोटी सामने जिंकायचे असतील, तर आम्हाला एकत्र येऊन एक युनिट म्हणून कामगिरी करावी लागेल आणि आम्ही तसे केले नाही. यापूर्वीही येथे खेळाडू येऊन खेळले आहेत. आम्हाला येथे काय करायचे आहे हे माहित आहे आणि प्रत्येकाला त्यांची योजना माहित आहे.’

परिस्थितीशी नीट जुळवून घेऊ शकलो नाही –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, ‘आमच्या फलंदाजांना आव्हान होते आणि आम्ही स्वत:ला येथील परिस्थितीशी नीट जुळवून घेऊ शकलो नाही. आम्ही त्यांना धावा करताना पाहिले, पण आम्हाला विरोधी संघाला आणि त्यांची ताकदही समजून घेण्याची गरज आहे. आम्ही दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली नाही, त्यामुळेच आम्ही येथे उभे आहोत. आमच्याकडे खूप सकारात्मक गोष्टी नाहीत, परंतु केएलने अशा खेळपट्टीवर आम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे, हे दाखवून दिले.’

हेही वाचा – IND vs SA : विराट कोहलीने रचला इतिहास! १४६ वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

सामन्याबद्दल बोलायचे, तर सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. गुरुवारी (२८ डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात १३१ धावांवर सर्वबाद झाली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. यामध्ये केएल राहुलच्या शतकाचा समावेश होता. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डीन एल्गर, मार्को जॅन्सेन आणि कागिसो रबाडाने मोलाचे योगदान दिले. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India captain rohit sharma blamed the bowling and batting for the humiliating defeat in the first test against south africa vbm