राजकोट : कसोटी क्रिकेटमध्ये आजपर्यंत धावांच्या फरकाने सर्वांत मोठा विजय मिळविल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. युवा संघासह असा विजय मिळविणे ही एक चांगली भावना असून, भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे देखील आहे, असे रोहित म्हणाला. तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर ४३४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, सर्फराज खान अशा युवा खेळाडूंची कामगिरी या सामन्यात निर्णायक ठरली होती.
‘‘संघाच्या यशात अनुभवीपेक्षा युवा खेळाडूंची कामगिरी उजवी ठरली आहे. जुरेल, सर्फराज या दोन खेळाडूंनी पदार्पण केले होते. त्याचबरोबर संघात खूपच कमी कसोटी सामने खेळलेले खेळाडू देखील अधिक होते. यातील प्रत्येक जण मैदानावर येत असलेल्या अनुभवातून शिकत होता. जुरेल आणि सर्फराज यांनी आपली निवड सार्थ ठरवली,’’ असे रोहित म्हणाला.
हेही वाचा >>> ‘मी माझ्या कारकिर्दीत इतके षटकार मारले नाहीत, जितके यशस्वीने…’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून कौतुक
संघातील एकूण वातावरण आणि परिस्थितीवर भाष्य करताना रोहितने अनेक अनुभवी खेळाडू जायबंदी झाल्याकडे लक्ष वेधले. ‘‘प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत सामना खेळणे आणि नंतर तो जिंकण्याचा विचार करणेदेखील खूप कठीण होते. आघाडीच्या फळीत प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आमची चिंता वाढवत आहे. अशा वेळेस युवा खेळाडूंनी स्वत:च्या खांद्यावर धुरा घेत जो सकारात्मक खेळ केला, तो महत्त्वाचा ठरला,’’असे रोहितने सांगितले.
सामना चौथ्याच दिवशी संपल्याबद्दल रोहितने आश्चर्य व्यक्त केले. रोहित म्हणाला, ‘‘चौथ्या दिवशी सामना संपेल असे वाटले नव्हते. धावांचे आव्हान भक्कम झाल्यावर इंग्लंडला खेळण्यासाठी पुरेशी षटके उपलब्ध करून द्यायची याच उद्देशाने डाव सोडला. पण, सामना चौथ्याच दिवशी संपला याचे मला आश्चर्य वाटले.’’
हेही वाचा >>> रणजी ट्रॉफी : विदर्भाचा हरियाणावर ११५ धावांनी विजय, ‘या’ आंतरराष्ट्रीय खेळाडूला निरोप…
अश्विनच्या धैर्याचेही रोहितने कौतुक केले. ‘‘सामना सुरू असताना एका प्रमुख खेळाडूशिवाय खेळणे सोपे नसते. पण, शेवटी कौटुंबिक जबाबदारी महत्त्वाची असते. ती नाकारता येत नाही. त्यामुळे अश्विनशिवाय खेळणे मला अवघड वाटत होते. कौटुंबिक जबाबदारी आणि संघाची गरज यामध्ये अश्विनने सुरेख समन्वय साधला. त्याच्या धैर्याला दाद द्यायलाच हवी,’’ अशा शब्दात रोहितने अश्विनची स्तुती केली.
जैस्वालच्या कामगिरीचे कौतुक केले असले तरी, त्याच्याविषयी फार काही वक्तव्य करण्यास नकार दिला. ‘‘सगळेच जैस्वालविषयी बोलत आहेत. त्याला खेळाडू द्या. तो चांगला खेळत आहे. त्याच्यासाठी आणि संघासाठी ते चांगले आहे. त्याने असेच सातत्य राखावे इतकेच मला वाटते,’’ असे रोहित म्हणाला.
कुठल्याही खेळपट्टीवर जिंकू शकतो
फलंदाजांना पूरक असो किंवा गोलंदाजीला साथ देणारी खेळपट्टी, आम्ही कुठल्याही खेळपट्टीवर जिंकू शकतो. फिरकीस साथ देणाऱ्या खेळपट्टी हे आमचे बलस्थान असले, तरी यापूर्वीही आम्ही अनेक वेगळ्या खेळपट्ट्यांवर विजय मिळवले आहेत. खेळपट्टी कशी असावी यावर आम्ही चर्चा करत नाही. खेळपट्टी पाहिल्यावर आम्ही त्यानुसार नियोजन करतो, असेही रोहितने सांगितले.