सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडिया सिमेंट्स आणि तिच्या सहकंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दूर करण्याचे फर्मान काढले आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा देताना सांगितले की, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बीसीसीआयशी निगडित असलेल्या इंडिया सिमेंट्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना पदे सोडण्यास सांगण्यात आली आहेत.’’
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि श्रीनिवासन यांचे खास मानले जाणारे काशी विश्वनाथन हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे आणि नवीन भागाचा विकास करणाऱ्या उपसमितीचे सदस्यत्व भूषवत होते. विश्वनाथन हे इंडिया सिमेंट्सच्या लेखापाल विभागाचे बरीच वष्रे प्रमुख होते. दोन वर्षांपूर्वीच ते निवृत्त झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विश्वनाथन यांच्याप्रमाणेच अनेक जणांना बीसीसीआयमधून काढून टाकण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) मुख्य वित्त अधिकारी प्रसन्ना कन्नन, भारतीय संघाचे लॉजिस्टिक व्यवस्थापक एम. ए. सतीश, बीसीसीआयच्या विभागीय अकादमी समितीचे सदस्य आर. आय. पालानी यांचा समावेश आहे. पालानी हे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिव पदावर, तर रामन हे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी करताना आयपीएलसंदर्भातील प्रभारी अध्यक्षपदाची धुरा सुनील गावस्कर यांच्याकडे दिली आहे, तर बीसीसीआयच्या अन्य कामकाजांची जबाबदारी शिवलाल यादव यांच्याकडे सोपवली आहे. याचप्रमाणे इंडिया सिमेंट्स आणि तिच्या सहकंपन्यांचे कर्मचारी बीसीसीआयच्या पदांवर राहू शकत नाही, असे आदेशही देण्यात आले. या वेळी सर्वोच्च न्यायालयाने इंडिया सिमेंट्सच्या नोकरीत असलेल्या समालोचक आणि खेळाडूंना मात्र दिलासा दिला आहे. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कंपनीचा उपाध्यक्ष आहे. याचप्रमाणे आर. अश्विन, दिनेश कार्तिक, राहुल द्रविड, एल. शिवरामकृष्णन असे अनेक आजी-माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सध्या इंडिया सिमेंट्सच्या सेवेत आहेत.

विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची  बीसीसीआयच्या सदस्यांची मागणी
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून दूर होण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करावी, अशी मागणी अनेक सदस्यांनी केली आहे. न्यायालयाने माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी कारभार दिला आणि यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे नियोजन पाहण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे बीसीसीआयची विशेष सभा घ्यावी अशी मागणी आम्ही केली आहे, असे एका सदस्याने सांगितले. मात्र हा आदेश न्यायालयाने दिला असल्यामुळे ही सभा आयोजित करणे, हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे ही सभा घेता येईल की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. ही सभा रीतसर मागणी केलेली सभा नसून सदस्यांनी त्यांच्या वैयक्तिक हक्कासाठी केलेली सभा असू शकेल असेही या सदस्याने सांगितले.