राकेशकुमार (६९ किलो) व हरपालसिंग (७५ किलो) यांनी मिळविलेल्या सुवर्णपदकांसह भारताने इंडोनेशियातील पालेमबंग येथे झालेल्या प्रेसिडेंट चषक आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सांघिक विजेतेपद पटकाविले. भारतास प्रथमच हे यश मिळाले आहे.
भारताने या स्पर्धेत चार सुवर्ण व एक कांस्य अशी पाच पदके मिळवीत ३३ गुणांची कमाई केली. त्यापैकी दोन सुवर्ण एस. सरजुबाला (४८ किलो) व पिंकी जांगरा (५१ किलो) यांनी महिला गटात मिळविली.
हरपालने अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या जेई देओक सिओंग याच्यावर मात केली, तर राकेश याने जपानच्या हिरोकी किंजो याच्यावर सहज विजय मिळविला. ६० किलो गटात भारताच्या मनीषकुमार याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला उपान्त्य लढतीत मंगोलियाच्या दोर्जीयाम्बु ओतोंदालाई याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत तीस देशांचे १३० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरुबक्षसिंग संधू यांनी खेळाडूंच्या कामगिरीबाबत सांगितले, प्रथमच आमच्या खेळाडूंना सांघिक विजेतेपद मिळाले आहे. हे आमच्या खेळाडूंनी बॉक्सिंगमध्ये केलेल्या प्रगतीचे द्योतकच आहे. अशीच कामगिरी पुढे होईल अशी मला खात्री आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा