इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभवाच्या यार्डात अडकलेली भारतीय ‘एक्स्प्रेस’ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुसाट धावली. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताचा ‘विजय रथ’ दौडू लागला आणि चार सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय ‘मेल’ने विजयाचे बजेट यशस्वीरीत्या उभारत १-० अशी शिलकी जमा केली. बुधवारी फक्त २५ मिनिटांत भारताने ऑस्ट्रेलियाच्या ‘ट्रेन’ला २४१ धावांवर ‘ब्रेक’ लावला आणि जास्तीचे अपघात टाळून विजयासाठी आवश्यक असलेले ठिकाण आठ विकेट्स राखून गाठले. विजयाचा ‘ग्रीन सिग्नल’ भारताला सोमवारीच मिळाला होता, पण मोझेस हेन्रिक्स नावाचे फाटक मार्गात उभे ठाकलेले होते. भारतीय संघाने मांडलेला भक्कम संकल्प व मिळालेल्या सिग्नलच्या जोरावर हेन्रिक्स नावाचे फाटक अखेर खुले झाले आणि भारताची एक्स्प्रेस पुन्हा एकदा विजयाच्या रुळावर धावली. द्वि‘शताब्दी’ खेळी साकारून भारताची गाडी विजयाच्या रुळावर आणणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेन्रिक्स आणि नॅथन लिऑन (११) यांनी दिवसाची चांगली सुरुवात केली खरी, पण त्यांना धावसंख्येत मोठी भर घालता आली नाही. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने आपल्या जाळ्यात लिऑनला फसवले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ २४१ धावांवर तंबूत परतला. हेन्रिक्सने पदार्पणाच्या सामन्यातच नाबाद ८१ धावांची झुंज ‘काबिल-ए-तारीफ’ असली तरी त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. भारताला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने ५० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारतीय संघ एकही बळी न गमावता पूर्ण करेल, अशी अपेक्षा होती. पण मुरली विजय (६) आणि वीरेंद्र सेहवाग (१९) या दोन्ही सलामीवीरांनी दुसऱ्या डावातही अपेक्षाभंग केला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (नाबाद १३) दोन खणखणीत षटकार वसूल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३८०
भारत (पहिला डाव) : ५७२
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ईडी कोवन पायचीत गो. अश्विन ३२, शेन वॉटसन झे. सेहवाग गो. अश्विन १७, डेव्हिड वॉर्नर पायचीत गो. हरभजन २३, फिल ुजेस झे. सेहवाग गो. जडेजा ०, मायकेल क्लार्क पायचीत गो. अश्विन ३१, मॅथ्यू वेड त्रिफळा गो. हरभजन ८, मोझेस हेन्रिक्स नाबाद ८१, पीटर सिडल त्रिफळा गो. जडेजा २, जेम्स पॅटिन्सन झे. सेहवाग गो. अश्विन ११, मिचेल स्टार्क झे. तेंडुलकर गो. अश्विन ८, मॅथ्यू लिऑन झे. मुरली गो. जडेजा ११, अवांतर (बाइज ११, लेगबाइज २): १३, एकूण ९३ षटकांत सर्व बाद २४१
बाद क्रम : १-३४, २-६४, ३-६५, ४-१०१, ५-१२१, ६-१३१, ७-१३७, ८-१६१, ९-१७५, १०-२४१.
गोलंदाजी : आर. अश्विन ३२-६-९५-५, हरभजन सिंग २७-६-५५-२, रवींद्र जडेजा ३१-८-७२-३, इशांत शर्मा ३-१-२-०.
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय झे. हेन्रिक्स गो. पॅटीन्सन ६, वीरेंद्र सेहवाग झे. क्लार्क गो. लिऑन १९, चेतेश्वर पुजारा नाबाद ८, सचिन तेंडुलकर नाबाद १३, अवांतर (बाइज ४) : ४, एकूण ११.३ षटकांत २ बाद ५०.
बाद क्रम : १-१६, २-३६.
गोलंदाजी : जेम्स पॅटीन्सन ३-१-१३-१, मॅथ्यू लिऑन ५.३-०-२९-१, पीटर सिडल ३-२-४-०.
निकाल : भारत विजयी
सामनावीर : महेंद्रसिंग धोनी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा