Chess Olympiad 2024 India Wins First Gold Medal: भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये इतिहास घडवला आहे. अंतिम सामन्यात त्याने शानदार खेळ केला आणि भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. डी गुकेशने आता ४५व्या ऑलिम्पियाडमध्ये चमकदार कामगिरी करत संपूर्ण जगात भारताचे नाव उंचावले आहे. गुकेशने चेस ऑलिम्पियाडमधील ८ सामने जिंकले तर २ ड्रॉ सामने खेळले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने चमकदार कामगिरी करत बुद्धिबळ संघाला कायमच पाठिंबा दिला.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये खुल्या विभागात भारताने ऐतिहासिक पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला आहे. भारतीय संघात गुकेश डी, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे. अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला यूएसए विरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित झाले.
भारतीय संघाने स्पर्धेची स्वप्नवत सुरुवात केली आणि गेल्या सीझनमध्ये चॅम्पियन उझबेकिस्तानविरुद्ध बरोबरी साधण्यापूर्वी पहिले आठ सामने जिंकून चॅम्पियन संघ असल्याची ग्वाही दिली. २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने मायदेशात कांस्यपदक जिंकले. तर त्यांनी २०१४ मध्येही कांस्यपदकही जिंकले होते. बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशने अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करून भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक जवळपास निश्चित केले होते. भारताने १०व्या फेरीच्या सामन्यात अमेरिकेचा २.५-१.५ असा पराभव केला होता.
प्रत्येक राऊंड जिंकल्यावर दोन गुण
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रत्येक फेरीत दोन संघ एकमेकांविरूद्ध भिडतात. जर एका संघाने फेरी जिंकली तर त्याला दोन गुण मिळतील, आणि जर तो सामना अनिर्णित राहिला तर त्याला एक गुण मिळेल. या कारणास्तव भारताचे १० फेऱ्यांनंतर एकूण १९ गुण आहेत. सलग ८ फेऱ्या जिंकून भारताचे एकूण १६ गुण झाले. पण ९व्या फेरीत भारताला उझबेकिस्तानसोबत ड्रॉ खेळावा लागला, त्यामुळे भारताच्या खात्यात आणखी एक गुण जमा झाला आणि एकूण १७ गुण झाले. अमेरिकेला पराभूत केल्यानंतर संघाने १९ गुणांसह पहिले स्थान मिळविले.
हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताला मोठा फायदा, पराभवामुळे बांगलादेशला फटका, तर ‘या’ संघांना झाला फायदा