* रंगतदार तिसरी कसोटी भारताने ६ विकेट राखून जिंकली
* भारताची मालिकेवर ३-० अशी ऐतिहासिक विजयी आघाडी
* बोर्डर-गावस्कर चषकावर भारताचा कब्जा
पंजाब कसोटीच्या अखेरच्या दिवशी पीसीए स्टेडियमवर जे नाटय़ घडले, ते अविश्वसनीय होते. ८ बाद १४३ अशा केविलवाण्या स्थितीनंतर ऑस्ट्रेलियाचे शेपूट अनपेक्षितरीत्या वळवळले आणि तळाच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर तग धरत २२३ धावा केल्या. मग १३३ धावांचे तुटपुंजे आव्हान पेलतानाही भारताची त्रेधातिरपीट उडाली. चार फलंदाज तंबूत परतल्यावर आव्हान कठीण होत गेले. भारताच्या तोंडातून विजयाचा घास निसटणार आणि ही कसोटी ऑस्ट्रेलिया अनिर्णीत राखणार अशी चिन्हे दिसू लागली. सचिन तेंडुलकर धावचीत होऊन परतल्यावर नेमके हेच चित्र दिसत होते. परंतु रवींद्र जडेजाने कोणतेही दडपण न घेता पीटर सिडलला दोन चौकार ठोकत भारताचे जिंकण्याचे इरादे प्रकट केले. त्यानंतर ३ षटकांत ९ धावा भारताला हव्या होत्या. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मग आक्रमणाचे हत्यार मिचेल स्टार्कवर उगारले. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून आणि नंतरचे दोन स्क्वेअर लेगला सीमापार धाडून धोनीने भारताच्या विजयावर १५ चेंडू शिल्लक असताना शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी भारताने अत्यंत रोमहर्षक पद्धतीने ६ विकेट राखून विजय नोंदवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली. उभय देशांमधील ८१ वर्षांच्या कसोटी इतिहासात भारताने आजवर कोणत्याही मालिकेत दोनहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला नव्हता.
त्याआधी, मिचेल स्टार्क आणि झेवियर डोहर्टी या ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या जोडीने ६५ मिनिटे किल्ला लवून भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली. या जोडीने १८.१ षटकांत ४४ धावा केल्या. त्यामुळेच भारताचा सुखासीन विजय महत्प्रयासाने आवाक्यात आला. अखेरच्या तासाभराच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारताला किमान १५ षटकांत ४५ धावांची आवश्यकता होती. पण भारताने हिमतीने हे आव्हान पेलवले. मुरली विजय (२६), चेतेश्वर पुजारा (२८), विराट कोहली (३४) आणि सचिन तेंडुलकर (२१) हे फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनी (१८) आणि जडेजा (८) यांनी विजयी लक्ष्य पार केले.
गतवर्षी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ०-४ असा पराभव पत्करल्यामुळे भारताने बॉर्डर-गावस्कर चषक गमावला होता, परंतु आता मालिकेवर प्रभुत्व मिळवत चषकावरही आपले नाव कोरले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या दमदार शतकांमुळे भारताला पहिल्या डावात मोठे आव्हान उभारता आले. त्यामुळेच हा विजय भारताला साकारता आला. धवनने शनिवारी ऑसी गोलंदाजांवर चौखूर हल्ला चढवत फक्त ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि मग १८७ धावांची शानदार खेळी उभारली. सामनावीर किताब धवनलाच प्रदान करण्यात आला. शुक्रवारपासून पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला प्रारंभ होत आहे. मालिकेत ४-० असे प्रभुत्व मिळविण्याचा भारताचा इरादा आहे.
चौथ्या दिवसअखेर
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४०८
भारत (पहिला डाव) : ४९९
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : २२३
भारत (दुसरा डाव) : ४ बाद १३६
सत्र    षटके    धावा/बळी
पहिले सत्र    ४६    ९५/५
दुसरे सत्र    २९.२    ८३/२
तिसरे सत्र     २६.३    ८६/४    
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४०८
भारत (पहिला डाव) : ४९९
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : डेव्हिड वॉर्नर झे. धोनी गो. कुमार २, एडी कोवन पायचीत गो. कुमार ८, फिलिप ुजेस पायचीत गो. अश्विन ६९, स्टीव्हन स्मिथ त्रिफळा गो. कुमार ५, नॅथन लिऑन झे. लिऑन गो. ओझा १८, मायकेल क्लार्क झे. पुजारा गो. जडेजा १८, ब्रॅड हॅडिन पायचीत गो. अश्विन ३०, मोझेस हेन्रिक्स झे. आणि गो. जडेजा २, पीटर सिडल त्रिफळा गो. ओझा १३, मिचेल स्टार्क झे. अश्विन गो. जडेजा ३५, झेवियर डोहर्टी नाबाद १८, अवांतर (लेगबाइज ३, वाइड १, नो बॉल १) ५, एकूण ८९.२ षटकांत सर्व बाद २२३
बाद क्रम : १-२, २-३५, ३-५५, ४-८९, ५-११९, ६-१२३, ७-१२६, ८-१४३, ९-१७९, १०-२२३
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-१-३१-३, इशांत शर्मा ९-१-३४-०, आर. अश्विन ३१-९-७२-२, रवींद्र जडेजा १६.२-६-३५-३, प्रग्यान ओझा २१-६-४६-२, सचिन तेंडुलकर २-०-२-०
भारत (दुसरा डाव) : मुरली विजय यष्टिचीत हॅडिन गो. डोहर्टी २६, चेतेश्वर पुजारा पायचीत गो. लिऑन २८, विराट कोहली झे. ह्य़ुजेस गो. सिडल ३४, सचिन तेंडुलकर धावचीत २१, महेंद्रसिंग धोनी १८, रवींद्र जडेजा ८, अवांतर (वाइड १) १, एकूण ३३.३ षटकांत ४ बाद १३६
बाद क्रम : १-४२, २-७०, ३-१०३, ४-११६
गोलंदाजी : मिचेल स्टार्क १०.३-१-५१-०, पीटर सिडल ११-२-३४-१, नॅथन लिऑन ५-०-२७-१, झेवियर डोहर्टी ७-२-२४-१
आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला, पण भारताला या विजयाचे श्रेय द्यायला हवे. शिखर धवन आणि मुरली विजय यांनी दिलेली सलामी ही अप्रतिम होती, या विजयाचे श्रेय त्यांनाही द्यायला हवे. या पराभवाने नक्कीच आम्ही निराश झालो आहेत, पण दिल्लीतील अखेरचा सामना गोड व्हावा, हीच आशा आहे.
– मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार.
माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. पहिले ३-४ चेंडू दडपणाखाली खेळलो, पण एकदा सूर गवसल्यावर मात्र सारे काही सुरळीत झाले आणि मी माझा नैसर्गिक खेळ केला. खेळपट्टीवर अधिकाधिक उभे राहण्याचा माझा प्रयत्न होता, मला सहजासहजी विकेट गमवायची नव्हती. ही खेळी माझ्यासाठी अविस्मरणीय अशीच असेल.
– शिखर धवन, भारताचा सलामीवीर.
संघातील विजयात सर्वानीच चांगला हातभार लावला. फिरकीला पोषक खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनीही भेदक मारा केला. त्याचबरोबर शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला अप्रतिम सुरुवात करून दिली. धवनने झोकात पदार्पण केले. भारताने मालिका जिंकली असून चौथ्या कसोटी सामन्यात काही प्रयोग करण्यावर भर असेल.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार.
गावस्कर वैतागतात तेव्हा..
मोहाली : खेळाडूंवर चाहत्यांचे अपार प्रेम असते, तो खेळताना क्वचितच भेटतो, पण निवृत्तीनंतरही त्याच्यावरचे प्रेम कमी होत नाही. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी मात्र चाहत्यांना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या रागाला सामोरे जावे लागले. समालोचन कक्षाबाहेर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन आणि भारताचा माजी फलंदाज संजय मांजरेकर चाहत्यांना स्वाक्षरी देऊन त्यांच्यासह छायाचित्र घेत होते. यादरम्यान चाहत्यांच्या आवाजाने गावस्कर वैतागले आणि ‘‘तुम्ही सामना पाहायला आले आहात ना, मग आपल्या जागेवर जाऊन सामना बघा. तुमच्या आवाजामुळे आमच्या कामात व्यत्यय आणू नका,’’ असे खडे बोल त्यांनी सुनावले.
धवन चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
मोहाली : भारतीय क्रिकेटमधील नवा उदयाला आलेला तारा शिखर धवन दिल्लीमध्ये २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला हाताला झालेच्या दुखापतीमुळे मुकण्याची शक्यता आहे. धवन सोमवारी क्षेत्ररक्षणासाठी उतरू शकला नाही, याचप्रमाणे भारताच्या डावाची सुरुवातही करू शकला नाही. भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले की, ‘‘डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे शिखर अखेरच्या कसोटीत न खेळण्याची दाट शक्यता आहे. लवकरच याबाबत अधिकृतरीत्या स्पष्ट होईल.’’

Story img Loader