Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वच भारतीय खेळाडूंचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं असून ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. मात्र, एकीकडे भारतीय खेळाडू पराभवामुळे निराश झाल्याचं चित्र दिसत असताना तमाम भारतीय क्रिकेट चाहते आपल्या खेळाडूंच्या कामगिरीचा गर्व वाटत असल्याची प्रतिक्रिया देत आहेत. पण विश्वचषक गमावल्यानंतर पुढे काय? या प्रश्नावर संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं सूचक विधान केलं आहे.
यंदाच्या विश्वचषकात एकही सामना न गमावलेल्या भारतीय संघानं विश्वविजेतेपद जिंकण्याच्या निर्धारानंच आज मैदानावर पाऊल ठेवलं. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. पॅट कमिन्सनं भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. गेल्या १० सामन्यांप्रमाणेच याही सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं भारताला तडाखेबाज सुरुवात करून दिली. पहिल्या १० षटकांमध्ये भारताच्या ८० धावा फलकावर लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर ठराविक अंतरानं भारताचे गडी बाद होत गेले. परिणामी अंतिम सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर भारताला फक्त २४१ धावांचं आव्हान ठेवता आलं.
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये विश्वचषकातील आपल्या कामगिरीला साजेशीच गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचे तीन गडी भारतानं लवकर टिपले. त्यानंतर मात्र ट्रेविस हेड व मार्नस लाबुशेन यांनी भारतीय गोलंदाजांना डोकं वर काढू दिलं नाही. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी १९२ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दाराशी नेऊन ठेवलं. शेवटी ट्रेविस हेड बाद झाला. मात्र, ग्लेन मॅक्सवेलनं विजयी फटका मारत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
राहुल द्रविड संघाच्या पाठिशी
दरम्यान, या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं कर्णधार रोहित शर्मा व भारतीय संघाची पाठराखण केली आहे. “आम्ही या विश्वचषक स्पर्धेत निर्भिड होऊन खेळलो. अंतिम सामन्याही आम्ही पहिल्या पॉवरप्लेमध्ये ८० धावा फलकावर लावल्या होत्या. कधीकधी तुम्हाला डावाला आकार द्यावा लागतो, सावध खेळावं लागतं. त्यामुळे आजच्या सामन्यात आम्ही कुठेच अतीबचावात्मक खेळलो नाही”, असं तो पत्रकार परिषदेत म्हणाला. “या विश्वचषकात रोहित एक उत्तम कर्णधार राहिला आहे. त्याचा ड्रेसिंग रुममधला वावर कायम तसाच राहिला आहे. तो नेहमीच कुणासाठीही कोणत्याही विषयावरच्या चर्चेसाठी उपलब्ध असायचा. रोहित शर्मानं या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा आणि वेळ दिला आहे”, अशा शब्दांत त्यानं रोहित शर्माचं कौतुक केलं.
प्रशिक्षकपदावर प्रश्नचिन्ह!
दरम्यान, आता राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदाबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विश्वचषक स्पर्धेपर्यंतच राहुल द्रविडचा बीसीसीआयबरोबर मुख्य प्रशिक्षक म्हणून करार होता. आता तो करार संपला आहे. त्यामुळे राहुल द्रविड पुढेही प्रशिक्षकपदी कायम राहणार की नवीन व्यक्ती त्या जागी येणार? याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता राहुल द्रविडनं त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ट्रेविस हेड म्हणतो, “आज रोहित शर्मा जगातला सर्वात दुर्दैवी …
“मी अजून प्रशिक्षकपदावर विचार केलेला नाही. मला त्यावर विचार करायला वेळच मिळाला नाही. पण मला वेळ मिळेल तेव्हा मी त्यावर नक्कीच विचार करेन. मी फक्त या विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं होतं”, असं राहुल द्रविड म्हणाला आहे.