Australia Won ICC Cricket World Cup 2023 against India: कोट्यवधी भारतीयांच्या विजयाच्या अपेक्षा खांद्यावर घेऊन अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर उतरलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. गेल्या १० सामन्यांमध्ये तुफान खेळ करत अजेय राहिलेल्या भारतीय संघालाच विश्वविजयासाठी पहिली पसंती दिली जात होती. मात्र, ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात सरस खेळ केल्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या पराभवानंतरही भारतीय क्रिकेट चाहत्यांचं आपल्या क्रिकेटपटूंवरचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. सर्वच स्तरातून क्रिकेटपटूंवर चांगल्या कामगिरीसाठी कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पराभवानंतर रोहित शर्माप्रमाणेच भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनंही त्याची भूमिका मांडली आहे.
मधल्या षटकांत अतीबचावात्मक खेळ झाला?
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल द्रविडनं पराभवाबाबत त्याची भूमिका मांडली. “आम्ही या विश्वचषक स्पर्धेत निर्भिड होऊन खेळलो. अंतिम सामन्याही आम्ही पहिल्या पॉवरप्लेमध्ये ८० धावा फलकावर लावल्या होत्या. कधीकधी तुम्हाला डावाला आकार द्यावा लागतो, सावध खेळावं लागतं. त्यामुळे आजच्या सामन्यात आम्ही कुठेच अतीबचावात्मक खेळलो नाही”, असं म्हणत राहुल द्रविडनं विराट कोहली, के. एल. राहुल यांच्या संथ खेळण्याच्या धोरणाचं समर्थन केलं.
रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
अंतिम सामन्यातील पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्व कौशल्यावर काही प्रश्न उपस्थित केले जात असल्याबाबत विचारणा केली असता राहुल द्रविडनं ते स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. “या विश्वचषकात रोहित एक उत्तम कर्णधार राहिला आहे. त्याचा ड्रेसिंग रुममधला वावर कायम तसाच राहिला आहे. तो नेहमीच कुणासाठीही कोणत्याही विषयावरच्या चर्चेसाठी उपलब्ध असायचा. रोहित शर्मानं या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रचंड ऊर्जा आणि वेळ दिला आहे. त्याची फलंदाजीही त्याच पद्धतीची राहिली आहे. त्यानं प्रत्येक सामन्यात संघासाठी सुरुवातीपासूनच एक दिशा निश्चित करून दिली. त्याला त्याच्या फलंदाजीतून इतर फलंदाजांसाठी एक उदाहरण घालून द्यायचं होतं”, अशा शब्दांत राहुल द्रविडनं रोहित शर्माचं कौतुक केलं.
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर ट्रेविस हेड म्हणतो, “आज रोहित शर्मा जगातला सर्वात दुर्दैवी माणूस!”
“ड्रेसिंग रुममध्ये भावनिक वातावरण होतं”
दरम्यान, डोळ्यांत अश्रू घेऊन ड्रेसिंग रूममध्ये जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना सर्वांनीच पाहिलं. त्यामुळे पराभवानंतर ड्रेसिंग रुममधलं वातावरण कसं होतं? अशी विचारणा केली असता राहुल द्रविडनंही भावनिक प्रतिक्रिया दिली. “सर्वच खेळाडूंचा अपेक्षाभंग झाला आहे. ड्रेसिंग रुममध्ये प्रचंड भावनिक वातावरण होतं. एक प्रशिक्षक म्हणून त्या सर्वांना असं पाहाणं फार अवघड होतं. त्यांनी या स्पर्धेसाठी केलेल्या असंख्य तडजोडी आणि केलेली प्रचंड मेहनत आपण सगळ्यांनी पाहिली आहे”, असं राहुल द्रविड म्हणाला.