भारताने आशियाई विजेत्या दक्षिण कोरियावर ३-० असा सफाईदार विजय नोंदवीत विश्वचषक हॉकी स्पर्धेत नववे स्थान मिळविले आणि विजयासह निरोप घेतला. आकाशदीपसिंग याने दोन गोल करीत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.
भारतास गतवर्षी इपोह (मलेशिया) येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील अंतिम फेरीत कोरियाने ४-३ असे हरविले होते. या पराभवाची परतफेड भारताने केली.
आकाशने सहाव्या मिनिटाला एस.व्ही.सुनील याच्या पासवर संघाचे खाते उघडले. पुन्हा त्याने ५० व्या मिनिटाला रिव्हर्स फटका मारून आणखी एक गोल केला.
या दोन गोलांदरम्यान रूपींदरपालसिंग याने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करीत संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. कोरियाकडून अपेक्षेइतक्या प्रभावी खेळ झाला नाही. त्यांना १० व्या मिनिटाला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती मात्र त्यांच्या जुआन बियांगजिन याने मारलेला फटका भारताचा गोलरक्षक पी.आर. श्रीजेश याने शिताफीने अडविला.
भारतास २०१० च्या विश्वचषक स्पर्धेत आठवे स्थान मिळाले होते. यंदा नवव्या क्रमांकावर त्यांना समाधान मानावे लागले.
श्रीजेशचे शतक पूर्ण!
भारताचा गोलरक्षक श्रीजेश याने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील स्वत:चा शंभरावा सामना पूर्ण केला. २००४ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले. ऑलिम्पिक क्रीडा (२०१२) स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Story img Loader