चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत सहा वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघाची यंदाच्या या स्पर्धेत कसोटी ठरणार असून शनिवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात त्यांच्यापुढे इंग्लंडचे आव्हान आहे. लंडन ऑलिम्पिकमधील निराशाजनक कामगिरीनंतर पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतास येथे सर्वोच्च क्षमता दाखवितच खेळावे लागणार आहे.
पर्थ येथे नुकत्याच झालेल्या नाईन अ साईड स्पर्धेत भारतास फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. त्यांना केवळ पाकिस्तानवर ५-२ अशी मात करता आली होती. अन्य लढतीत त्यांना हार पत्करावी लागली होती. या स्पर्धेनंतर झालेल्या चार देशांच्या स्पर्धेत कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत पाकिस्तानने भारतावर मात करीत या पराभवाची परतफेड केली होती.
भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनी चॅम्पियन्स स्पर्धेत चांगल्या कामगिरीचा आत्मविश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, भूतकाळ विसरून नवीन आव्हानास सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्यावरच आम्ही भर देत आहोत. संघात अनेक तरुण खेळाडूंचा समावेश आहे आणि ते या स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी उत्सुक झाले आहेत. ही स्पर्धा नवोदित खेळाडूंसाठी अतिशय हुकमी संधी आहे. सरदारासिंग याच्याकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
पेनल्टी कॉर्नरतज्ज्ञ संदीपसिंग व माजी कर्णधार शिवेंद्रसिंग, तुषार खंडकर, इग्नेस तिर्की, गुरबाजसिंग, गोलरक्षक भरत छेत्री या वरिष्ठ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे.
वरिष्ठ खेळाडूंना वगळण्याचे समर्थन करीत नॉब्ज म्हणाले, काही वेळा संघास तरुण व नवीन रक्ताची आवश्यकता आहे. नवीन खेळाडू चमकदार कामगिरी करतील असा मला विश्वास असल्यामुळेच काही ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचे धाडस आम्ही केले आहे. संदीपसिंगच्या जागी व्ही.आर.रघुनाथ याच्याकडून पेनल्टी कॉर्नरद्वारा अधिकाधिक गोलांची अपेक्षा आहे.
भारतीय संघास साखळी ‘अ’ गटात स्थान देण्यात आले असून या गटात ऑलिम्पिक विजेता जर्मनी, न्यूझीलंड, इंग्लंड यांचाही समावेश आहे.
‘ब’ गटात यजमान ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, पाकिस्तान व बेल्जियम यांचा समावेश आहे. विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेत चार वेळा विजेतेपद मिळविले आहे.

Story img Loader