भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. ते जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवतात. इंग्लंडने नुकताच आमचा दौरा रद्द केला होता. पण भारताविरुद्ध असे करण्याचे धाडस कोणाकडेही नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. यापुर्वी पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा यांनीही म्हटले होते की, “बीसीसीआयने आयसीसीचा निधी रोखला तर पाकिस्तान (PCB) उद्ध्वस्त होईल”, या वक्तव्याचे देखील इम्रान खान यांनी समर्थन केले आहे. 

मिडल ईस्ट आयशी बोलताना इम्रान खान म्हणाले, “पैसा सर्वात महत्वाचा आहे. भारत सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. अशा परिस्थितीत कोणताही देश भारताविरोधात ते पाऊल उचलण्याचे धाडस करणार नाही, जे इंग्लंडने पाकिस्तानसोबत केले. केवळ खेळाडूच नव्हे तर विविध देशांच्या बोर्डला देखील भारताकडून पैसे मिळतात. यामुळे भारत जागतिक क्रिकेटवर पूर्णपणे नियंत्रण ठेवत आहे.”

इम्रान खान म्हणाले, “मला वाटते इंग्लंडला अजूनही वाटते की पाकिस्तानसारख्या देशांविरुद्ध खेळून ते उपकार करतात. याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आहे. मी पाकिस्तान आणि इंग्लंडमधील क्रिकेटचे संबंध वाढताना पाहिले आहेत. पण इथे त्यांनी स्वतःला कमी दर्शवले.”

इंग्लंड दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडनेही सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा रद्द केला होता. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानला पोहोचला होता. संघाने सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी दौरा रद्द केला. यामुळे टी -२० विश्वचषकाच्या पाकिस्तानच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. अलीकडेच, रमीम राजा म्हणाले होते की आयसीसीला त्याच्या उत्पन्नाचा ९० टक्के हिस्सा भारताकडून मिळतो.