दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्धच्या पाचही एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळविला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय मानांकनात आफ्रिका भारतास मागे टाकण्याची शक्यता आहे. ही मालिका रविवारपासून सुरू होत आहे. आफ्रिकेचा संघ सध्या चौथ्या स्थानावर आहे. भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. जर आफ्रिकेने सर्व सामने जिंकले तर ते या तीनही संघांना पिछाडीवर टाकून अग्रस्थानावर झेप घेण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्यांना अग्रस्थानाकरिता असलेले पावणे दोन लाख डॉलर्सचे पारितोषिक मिळेल. यापूर्वी २००८ व २००९ मध्ये आफ्रिकेने अव्वल स्थानासाठीचा चषक जिंकला आहे. जर आफ्रिकेने ४-१ असा विजय मिळविला तर ते दुसऱ्या स्थानावर येतील. आफ्रिकेने यापूर्वीच कसोटी मानांकनात आघाडी स्थान घेतले आहे. पाकिस्तानने आफ्रिकेविरुद्धचे सर्व सामने जिंकले तर ते सहाव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचतील.