पीटीआय, कोलकता : तुम्ही जेव्हा भारतात घरच्या खेळपट्टय़ांवर धावा करू शकत नाही; तेव्हा तुमच्यावर टीका ही होणारच, अशी टिप्पणी करत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने सलामीचा फलंदाज केएल राहुलची शिकवणी घेतली. राहुलला गेल्या १० कसोटी सामन्यांत २५ धावांचाही टप्पा ओलांडता आलेला नाही. त्याची ४७ कसोटी सामन्यांतील सरासरी ३७पेक्षा कमी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘भारतात खेळता तेव्हा तुमच्याकडून धावा या अपेक्षितच असतात. पण, जेव्हा धावा होत नाहीत, तेव्हा तुमच्यावर टीका ही होणारच. राहुल हा असा एकमेव खेळाडू आहे, असे नाही. यापूर्वी अशी वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. त्या प्रत्येकाला टीकेला सामोरे जावे लागले आहे,’’ असे गांगुली म्हणाला. ‘‘सध्या खेळाडूंच्या दबावाकडे अधिक लक्ष दिले जात आहे. या दबावाला अनेक खेळाडू बळी पडतात. संघ व्यवस्थापनाला राहुल एक महत्त्वाचा खेळाडू वाटतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे. सामन्यासाठी संघ निवडताना शेवटी कर्णधार आणि प्रशिक्षकाला काय वाटते हे महत्त्वाचे असते. राहुल एक गुणी खेळाडू आहे. भारताच्या प्रमुख फलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. राहुलने नऊ वर्षांत केवळ पाच शतके झळकावली आहेत. पण, आता तो अपयशाच्या गर्तेत सापडला आहे. अर्थात, यातून बाहेर पडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. राहुलला यातून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा,’’ असेही गांगुलीने सांगितले.

राहुलच्या एकूण स्थितीबद्दल गांगुली म्हणाला की,‘‘सध्या तो मानसिक दबावाखाली आहे आणि त्याला तंत्रातही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. राहुल सध्या केवळ वेगवानच नाही, तर फिरकी गोलंदाजीवरही बाद होत आहे. फलंदाज अपयशाच्या गर्तेत अडकला असताना, त्याला पहिल्या दोन कसोटय़ांसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीवर खेळावे लागते, तेव्हा अडचणी अधिक वाढतात. कारण, अशा खेळपट्टय़ांवर चेंडू फिरतही असतो आणि अचानक उसळीही घेत असतो.’’

राहुलच्या जागी शुभमन गिलला घेण्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत गांगुलीने सांगितले की, ‘‘गिलच्या समावेशाची चर्चा होत असली, तरीही त्याला अजून प्रतीक्षा करावी लागली, तर काही नुकसान होणार नाही. प्रत्येकाची एक वेळ असते. तशी संधी समोर यावी लागते. संघ व्यवस्थापन आणि निवड समितीचे त्याच्याकडे लक्ष आहे. नाही, तर शुभमन मर्यादित षटकांच्या सामन्यात खेळलाच नसता.’’

शीर्ष फलंदाजी फळीकडून गांगुलीला अपेक्षा

गांगुलीने भारताच्या अन्य फलंदाजांबाबतही प्रश्न उपस्थित केला. भारताने दोन कसोटी सामने जिंकले आहेत, पण रोहित शर्माखेरीज अन्य फलंदाज अर्धशतकापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. तळातील फलंदाजी त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी केलेली बघायला मिळते. भारताचे प्रमुख फलंदाजही फिरकीसमोर गडबडताना दिसून आले. मात्र, गांगुली यावर सहमत नाही. गांगुली म्हणाला की,‘‘पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत वापरण्यात आलेली खेळपट्टी खरंच खूप आव्हानात्मक होती. अश्विन, जडेजा, लायन, टॉड मर्फीसारख्या गोलंदाजांसमोर त्या खेळपट्टय़ांवर खेळणे कठीण होते. भारताने दोन कसोटी सामने पाच दिवसांच्या आत जिंकल्याचे आपल्याला आश्चर्य वाटले नाही. भारतीय संघ मायदेशात खेळतो तेव्हा तो वेगळाच असतो.’’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India criticized comments former captain sourav ganguly on kl rahul ysh