युवा आघाडीवीर मनदीप सिंग याच्या सुरेख कामगिरीमुळे भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेत शानदार सुरुवात केली. मनदीपच्या हॅट्ट्रिकमुळे भारताने ओमानचा ८-० असा धुव्वा उडवला.
दोन्ही सत्रांत प्रत्येकी चार गोल करत भारताने ओमानवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. भारताच्या विजयात मनदीप (चौथ्या, ४०व्या आणि ४४व्या मिनिटाला), रमणदीप (१७व्या मिनिटाला), व्ही. आर. रघुनाथ (२८व्या मिनिटाला), रूपिंदरपाल सिंग (३४व्या मिनिटाला), मलक सिंग (४७व्या मिनिटाला) आणि एस. के. उथप्पा (६९व्या मिनिटाला) यांनी मोलाचा वाटा उचलला.
भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक हल्ले चढवत ओमानच्या बचावफळीला भगदाड पाडले. भारताला सहापैकी दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आले. सातव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीकॉर्नरवर रूपिंदरपालने मारलेला फटका ओमानचा गोलरक्षक अल नौफाली फहाद खामिस सलमीन याने अडवला. मात्र लगेचच मनदीपने गोल करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रमणदीपने १७व्या मिनिटाला गोल लगावला. २८व्या मिनिटाला रघुनाथने पेनल्टीवर तिसरा गोल केला. ३४व्या मिनिटाला रूपिंदरपालने चौथ्या गोलाची भर घातली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मनदीपने चिंगलेनसाना सिंगच्या क्रॉसवर आपला दुसरा गोल साजरा केला. चार मिनिटांनंतर आणखी एक गोल करत मनदीपने हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर मलक आणि उथप्पा यांनी गोल करून भारताला दणदणीत विजय मिळवून दिला.  
      पहिल्या सत्रात आम्ही अत्यंत चांगला खेळ केला. परंतु दुसऱ्या सत्रात आम्ही ढिसाळ खेळाचे प्रदर्शन केले. पण असे घडू शकते. ७-०, ८-० अशी आघाडी असताना एकाग्रतेने शंभर टक्के खेळ करणे खरंच अवघड आहे. उष्ण वातावरणाचा आम्हाला फटका बसला.
रोलँट ओल्टमन्स, भारताचे प्रशिक्षक

Story img Loader