महिला आशिया चषकात भारतीय संघाचा दुसरा सामना सोमवारी मलेशियाशी आहे. या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकंत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यानुसार भारताने उत्तम सुरूवात केली. या सामन्यासाठी स्म्रीती मंधाना हिला विश्रांती दिली असून तिच्या अनुपस्थितीत सभिनेनी मेघना शेफाली वर्मा हिच्यासोबत सलामीला आली. यावेळी भारताने २० षटकात ४ गडी गमावत १८१ धावांचा डोंगर उभारला आहे. पण धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मलेशियाने ५.२ षटकात २ गडी गमावत केवळ १६ धावा केल्या. मात्र त्यानंतर अचानक पाऊस पडल्याने सामना पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाला डकवर्थ लुईसच्या नियमानुसार ३०धावांनी विजयी घोषित करण्यात आले. भारताची सलामीवीर एस मेघना हिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

तत्पूर्वी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १८१ धावा केल्या. सभिनेनी मेघना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये ४७ धावा करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. मेघनाने-शफाली यांनी पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. मेघनाने अर्धशतकी खेळी केली. तिने ५३ चेंडूत ६९ धावा केल्या. यामध्ये तिने ११ चौकार आणि एक षटकार खेचला. ती बाद झाल्यावर शफालीने रिचा घोष हिच्यासोबत ४२ धावांची भागीदारी केली. शफाली ४६ धावा करत बाद झाली. तिने एक चौकार आणि तीन षटकार खेचले, तर किरण नवगिरे ही भोपळाही फोडू शकली नाही.

श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात अनेक प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. उपकर्णधार स्मृती मंधानाबरोबर स्नेह राणा, पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंग ठाकुर यांनाही आराम दिला गेला. त्यामुळे एस मेघना आणि किरण नवगिरे यांच्यासोबत राजेश्वरी गायकवाड आणि सभिनेनी मेघना यांना अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले.

दुपारनंतर दुसऱ्या डावात पावसाची शक्यता असल्याने भारतीय कर्णधार हरमनप्रीतने राजेश्वरी गायकवाड व दीप्ती शर्मा या दोन्ही फिरकी गोलंदाजांकडून गोलंदाजीची सुरुवात केली. ५.२ षटकांचा खेळ झाल्यानंतर पाऊस आल्याने सामना थांबवावा लागला. पाऊस न ओसरल्याने कमीत कमी पाच षटकांचा खेळ झाला असल्यामुळे, भारतीय संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार ३० धावांनी विजयी घोषित केले. भारतीय संघाला पुढील सामना युएईविरूद्ध खेळायचा आहे. त्यानंतर पाकिस्तान व बांगलादेश विरुद्ध अखेरचे दोन सामने खेळले जातील.

Story img Loader