भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र हाती घेतली. सौरव गांगुलीच्या पुढाकारामुळेच भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यात आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, भारतीय संघाच्या कर्णधारपदामध्ये विभागणी करण्यात यावी अशी मागणी होत होती. विराट कोहलीकडे कसोटी संघाचं कर्णधारपद देऊन, वन-डे आणि टी-२० संघाचं नेतृत्व रोहितच्या हाती सोपवावं असा विचार समोर आला होता.
सौरव गांगुलीने मात्र ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. या विषयावर आता चर्चाही करण्याची गरज नसल्याचं सांगत सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराटच कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून विराटवर अतिक्रिकेटचा ताण येऊ नये यासाठी विराटला बांगलादेश विरुद्ध टी-२० मालिकेत विश्रांती देण्यात आल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं, तो हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
अवश्य वाचा – Ind vs Ban : सामना गमावूनही रोहित शर्मा ठरला अव्वल
दरम्यान बांगलादेश विरुद्ध टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकलं आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने केवळ ९ धावांची खेळी केली. शफिऊल इस्लामच्या पहिल्याच षटकात रोहित पायचीत झाला. मात्र या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने आपला साथीदार विराट कोहलीला मागे टाकलं. रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पहिल्या सामन्याआधी रोहितला विराटचा विक्रम मोडण्यासाठी ७ धावांची गरज होती.